'टायटॅनिक' फेम अभिनेता बिली झेन आगामी 'वॉल्ट्जिंग विथ ब्रँडो' या मार्लन ब्रँडोच्या बायोपिकमध्ये मुख्य भूमिका साकारत आहे. ही व्यक्तीरेखा साकारण्यासाठी त्यानं घेतलेली मेहनत वाखाणण्याजोगी आहे. या चरित्रपटाचा प्रीमियर टोरिनो फिल्म फेस्टीव्हलमध्ये पार पडणार आहे. यामधील बिली झेनचं मार्लन ब्रँडोच्या भूमिकेत झालेलं रुपांतर पाहून जगभरातील तमाम प्रेक्षक आश्चर्यचकित झाले आहेत. अनेकांना हा चित्रपट ऑस्कर पुरस्कार जिंकणार असल्याची खात्री वाटत आहे. 'वॉल्ट्जिंग विथ ब्रँडो' या बायोपिकचं दिग्दर्शन बिल फिशमन यांनी केलं आहे.
'वॉल्ट्जिंग विथ ब्रँडो' हा चित्रपट प्रामुख्याने 1969 आणि 1974 या कालावधीमध्ये सेट करण्यात आला आहे. या काळात मार्लन ब्रँडो पॅरिसमध्ये 'द गॉडफादर' आणि 'लास्ट टँगो' या जगभर गाजलेल्या चित्रपटामध्ये अभिनय करण्याची तयारी करत होता. मार्लन ब्रँडोची भूमिका बिली झेन साकारत असल्यामुळं या बायोपिकबद्दलची उत्कंठा वाढली आहे. अशातच या चित्रपटातील त्याचा फर्स्ट लूक ऑनलाईन समोर आल्यामुळं दोन्ही व्यक्तीरेखामधील दिसणार साम्य खरोखर चकित करणार आहे.
अभिनेता बिली झेन यानं 1997मध्ये आलेल्या 'टायटॅनिक' या चित्रपटात कॅलेडॉन हॉकलीची खलनायकी भूमिका साकारली होती. यासाठी त्याला स्क्रीन अॅक्टर्स गिल्ड पुरस्कारासाठी नामांकन मिळालं होतं. झेनच्या इतर चित्रपट भूमिकांमध्ये किट वॉकर/द फँटम या सुपरहिरो चित्रपटातील द फँटम, बॅक टू द फ्यूचर फ्रँचायझीमधील "मॅच", 'मेम्फिस बेले' चित्रटामधील लेफ्टनंट वॅल कोझलोव्स्की, 'डेमन नाइट' या चित्रपटातील कलेक्टर या गाजलेल्या भूमिकांचा समावेश आहे.
बिल फिशमन यांनी दिग्दर्शित केलेला आणि बर्नार्ड जजच्या लेखनावर आधारित 'वॉल्ट्जिंग विथ ब्रँडो' हा चित्रपट पाच वर्षांच्या महत्त्वपूर्ण कालावधीचा शोध घेणार आहे. या चित्रपटाचे बहुतांश शूटिंग टेटियारो येथील लोकेशन्सवर करण्यात आलं आहे. मार्लन ब्रँडोच्या 100 व्या जयंतीनिमित्तानं हा चित्रपट बनत असून ही त्याच्या उत्तुंग कारकिर्दीला आला त्याच्या प्रतिभेला दिलेली एक सलामी असेल.
बिली झेनने सोशल मीडियावर त्याच्या शूटिंगची झलक शेअर केली आहे आणि याला खूप सकारात्मक प्रतिक्रिया मिळत आहेत. अनेकांनी त्याच्या या व्यक्तीरेखेचं कौतुक केलं असून हा चित्रपट ऑस्करसाठी नॉमिनेट होणार असल्याचं भाकित केलं आहे.