मुंबई Game Changer Release Date : अभिनेता राम चरण आणि अभिनेत्री कियारा अडवाणी यांचा बहुप्रतीक्षित आगामी चित्रपट 'गेम चेंजर' चित्रपटगृहात दाखल होण्यासाठी सज्ज आहे. नुकतीच या चित्रपटाच्या निर्मात्यांनी प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. ही घोषणा राम चरणच्या चाहत्यांसाठी एका मेजवानीप्रमाणे आहे. राम चरणचे चाहते बऱ्याच दिवसांपासून 'गेम चेंजर' या चित्रपटाची वाट पाहात आहेत. 2022 साली 'आरआरआर' चित्रपटात राम चरण दिसला होता. यानंतर, तो 'गेम चेंजर' या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर परतत आहे. या चित्रपटाचं शूटिंग नुकतंच पूर्ण झालं आहे. आता 'गेम चेंजर' चित्रपटाच्या पोस्ट प्रॉडक्शनचं काम सुरू आहे.
'गेम चेंजर'ची रिलीज डेट जाहीर : या चित्रपटासंदर्भात निर्मात्यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये 'गेम चेंजर'ची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. श्री वेंकटेश्वरा क्रिएशन्सनं त्यांच्या इंस्टाग्राम स्टोरीवर कॉलीवूड स्टार धनुषचा आगामी चित्रपट 'रायन' 26 जुलै रिलीज तारीखच्या तेलुगू आवृत्तीच्या प्री-रिलीज इव्हेंटचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडिओमध्ये 'गेम चेंजर'चे निर्माते दिल राजू यांनी कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या लोकांना संबोधित करताना सांगितलं की, "गेम चेंजर' ख्रिसमसला प्रदर्शित होणार आहे. मात्र, निर्मात्यानं चित्रपटाच्या प्रदर्शनाची नेमकी तारीख जाहीर केलेली नाही. आता अनेकजण या चित्रपटाच्या रिलीजसाठी वाट पाहात आहेत.
साऊथ बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होईल 'हा' विशेष चित्रपट : रुपेरी पडद्यावर साऊथमधील 'विश्वंभर' चित्रपट त्याच काळात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात राम चरणचे वडील आणि साऊथचा मेगास्टार चिरंजीवी प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन वशिष्ठ मल्लीदी यांनी केलय. 22 ऑगस्ट रोजी चिरंजीवीच्या वाढदिवसाला निर्माते चित्रपटाचा फर्स्ट लुक लॉन्च करणार आहेत. दरम्यान 'गेम चेंजर' व्यतिरिक्त, राम चरण हा बॉलिवूड स्टार जान्हवी कपूरबरोबर 'आरसी 16' ('RC 16') मध्ये दिसणार आहे. सध्या या चित्रपटाची शूटिंग सुरू आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन बुची बाबू सना करत आहे. जान्हवी कपूरचा हा दुसरा टॉलिवूड चित्रपट असणार आहे.