चमोली - Rajinikanth spiritual journey : तमिळ आणि हिंदी चित्रपटांचे प्रसिद्ध अभिनेता सुपरस्टार रजनीकांत बद्रीनाथला पोहोचले. येथे रजनीकांत यांनी भगवान बद्री विशालचं दर्शन घेतलं. काही दिवसांपूर्वी रजनीकांत ऋषिकेश येथील दयानंद आश्रम ऋषिकेश येथून केदारनाथ-बद्रीनाथ यात्रेला निघाले होते. देवप्रयाग, रुद्रप्रयाग, कर्णप्रयाग, नंद प्रयाग आणि जोशीमठ मार्गे रजनीकांत आज बद्रीनाथ धाममध्ये पोहोचले.
बद्रीनाथ- केदारनाथ मंदिर समितीचे मीडिया प्रभारी हरीश गौर यांनी सांगितलं की, सुपरस्टार रजनीकांत प्रथम बद्रीनाथ धामला पोहोचले. सुपरस्टार रजनीकांत यांनी 1.30 वाजता बद्रीनाथ मंदिरात जाऊन प्रार्थना केली. त्यानंतर, बद्रीनाथ मंदिराचे प्रभारी कार्यकारी अभियंता अनिल ध्यानी यांनी रजनी यांना भगवान बद्रीविशालचा प्रसाद दिला. यानंतर त्यांनी महालक्ष्मी मंदिरात पूजाही केली. यावेळी रावल ईश्वर प्रसाद नंबूदिरी, धर्माधिकारी राधाकृष्ण थापलियाल, मंदिर अधिकारी राजेंद्र चौहान, ईओ नगर पंचायत सुनील पुरोहित, पोलीस स्टेशन प्रभारी नवनीत भंडारी, वेदपाठी रवींद्र भट्ट, लक्ष्मी मंदिराचे पुजारी दिनेश डिमरी आदी उपस्थित होते.
सुपरस्टार रजनीकांत बद्रीनाथला पोहोचल्यानंतर म्हणाले की, ते दरवर्षी बद्रीनाथ-केदारनाथ धाममध्ये आध्यात्मिक शांती आणि आध्यात्मिक अनुभव घेण्यासाठी येतात. बद्रीनाथ धामचे दर्शन घेतल्यानंतर केदारनाथला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. 1950 मध्ये म्हैसूरमध्ये जन्मलेल्या शिवाजीराव गायकवाड यांनी किशोरावस्थेपासूनच हिंदी आणि तमिळ चित्रपटांमध्ये नशीब आजमावले आणि एकापाठोपाठ एक चित्रपट सुपरहिट होत गेले. शिवाजीराव ते रजनीकांत होण्यापर्यंतचा प्रवास त्यांनी केला. 150 हून अधिक तमिळ आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केलेल्या रजनीकांत यांना दक्षिण भारतीय चित्रपटांचे दिग्गज सुपरस्टार म्हटलं जातं.
हेही वाचा -
- जून महिन्यात ओटीटीवर मनोरंजनाचा धमाका, पाहा कोणत्या मालिका, चित्रपट होणार रिलीज - OTT attractions of June
- जून महिन्यात रिलीज होणार 'कल्की 2898AD' ते 'चंदू चॅम्पियन' पर्यंत हे 10 चित्रपट - Movies releasing in June
- लवकरच प्रदर्शित होणारे 10 कॉमेडी चित्रपट तुम्हाला करतील टेन्शन फ्री, पाहा रिलीज तारखा - Top ten Coming Soon Comedy Movie