मुंबई Pankaj Udhas Famous Songs : गजलचे बादशहा म्हणून प्रसिद्ध असलेले पंकज उधास यांच्या निधनाच्या बातमीनं मनोरंजन क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. पंकज उधास यांनी आपल्या सुरेल आवाजानं प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं आहे. त्यांनी गायलेल्या 'चिट्ठी आयी है' या गाण्याची लोकप्रियता तर आजही कायम आहे. गझल हृदयाला भिडवणारा हा अनोखा आणि अगदी रुहानी आवाज आज शांत झालाय. त्यांच्या निधनानं देश एका मोठ्या गायकाला मुकला आहे.
- पंकज उधास यांचा दौर : समोर पंचपक्वान वाढलेलं असतानात्यात मीठ नसलं तर कसं वाटेल? गाण्याच्या थाळीतलं असंच मीठ म्हणजे 'पंकज उधास' आहेत. पहिल्यांदाच कुणाच्या प्रेमात पडल्यावर किंवा प्रेमाच्या गुलाबी हिंदोळ्यानंतर विरहाचे चटके सोसणाऱ्याला पंकज उधास आठवल्याशिवाय राहणार नाही. पंकज उधास यांची गाणी न ऐकलेला भारतीय क्वचितच आढळेल.
संपूर्ण कुटुंबच होते संगीतात पारंगत : पंकज उधास यांचा जन्म 17 मे 1951 साली गुजरातमधील जेतपूर येथे झाला. त्यांचं कुटुंब संगीतात पारंगत होतं. तसंच त्यांचे दोन्ही मोठे बंधू, निर्मल उधास आणि मनहर उधास हे प्रसिद्ध गायक होते. त्यामुळं पंकज यांना चित्रपटसृष्टीत प्रवेश मिळवणं सोप्प झालं. पंकज उधास यांना अगोदर तबला शिकायचा होता. त्यासाठी त्यांनी त्याचे पाठ गिरवायला सुरुवातही केली होती. त्यांचं महाविद्यालयीन शिक्षण मुंबईतील विल्सन कॉलेज आणि सेंट झेव्हियर्स कॉलेज येथे झालं. त्याकाळी त्यांची इंडियन पॉप गायनातही रुची होती. परंतु त्यांनी हिंदुस्थानी शास्त्रीय गायनासाठी गुलाम कादिर खान यांचा गंडा बांधला. त्यानंतर पंकज यांनी नवरंग नागपूरकर यांच्याकडं शास्त्रोक्त संगीताचं प्रशिक्षण घेतलं.
'या' गाण्यानंतर प्रसिद्धीच्या झोतात : पंकज यांचे पार्श्वगायनाचं पदार्पण 'कामना' या चित्रपटातील गाण्यानं झालं. हे गाणे नक्ष लायलपुरी यांनी लिहिले होते. तर संगीतबद्ध उषा खन्ना यांनी संगीतबद्ध केलं. 'कामना' हा चित्रपट फ्लॉप ठरूनही त्यांच्या गाण्याचं कौतुक झाले. परंतु, त्यानंतर प्रदर्शित झालेल्या संजय दत्त अभिनित 'नाम' या चित्रपटात पंकज उधास यांनी गायलेल्या 'चिट्ठी आयी है' या गझलनं सर्वत्र धुमाकूळ घातला. तसंच त्यांचा पहिला गझल अल्बम 'आहट' सुपरहिट ठरला होता. 'चांदी जैसा रंग है तेरा...' या त्यांच्या गझलने अनेक विक्रम मोडीत काढले होते. पंकज यांनी मोहरा, घायल, ये दिल्लगी, साजन, फिर तेरी कहानी याद आई, सारख्या चित्रपटातून पार्श्वगायन केलं होतं.
50 हून गझल अधिक अल्बम्स : पंकज उधास यांनी 50 हून अधिक गझल अल्बम्समधून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं. यात नशा, घुंघट, आशियाना, मुस्कान, हसरत, एहसास की खुशबू यासारख्या अनेक अल्बम्सचा सहभाग आहे. पंकज उधास यांना फिल्मफेयरचे आणि संगीत नाटक अकादमीचे सर्वोत्कृष्ट गायकाचे पारितोषिक मिळालेले आहे. तसंच त्यांना संगीत नाटक अकादमीचा सर्वोत्कृष्ट गझल गायक म्हणूनही अवॉर्ड प्राप्त झाला. पंकज उधास यांना 2006 मध्ये संगीत क्षेत्रातील योगदानासाठी 'पद्मश्री' या सर्वोच्च नागरी पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. मखमली आवाजाचा जादूगार, उत्कृष्ट गझल गायक, पंकज उधास यांना ईटीव्ही भारत परिवारतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली!
हेही वाचा -