मुंबई - हिंदी चित्रपटसृष्टीतील हँडसम अभिनेता देव आनंद यांच्या निधनाला आज ३ डिसेंबर रोजी १३ वर्षे पूर्ण झाली आहेत. देव आनंद यांचं वयाच्या ८८ व्या वर्षी ३ डिसेंबर २०११ रोजी लंडनच्या रुग्णालयात निधन झालं. त्यांच्या निधनाची बातमी समजताच चाहत्यांपासून मनोरंजन, क्रीडा आणि राजकीय विश्वात शोककळा पसरली होती. देव आनंद म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीतील एक रत्न म्हणून सिनेप्रेमींमध्ये अजरामर झाले आहेत. देव आनंद चित्रपटाबरोबरच त्यांच्या देखणेपणासाठीही प्रसिद्ध होते. त्या काळात अनेक अभिनेत्रींना देव आनंदबरोबर लग्न करायचं होतं. पण देव आनंद यांचं मन मात्र दोन अभिनेत्रींवर जडलं होतं. त्यातील एक अभिनेत्रींनं पडद्यावर त्यांच्या बहिणीची भूमिका साकारली होती. या अभिनेत्रीशी त्याला लग्न करायचं होतं. परंतु हिंदी सिनेमाचे शोमन राज कपूरमुळे त्यांचं हे स्वप्न अपूर्ण राहिलं.
देव आनंदची ड्रीम गर्ल कोण होती?
अभिनेत्री सुरैया हिनं देव आनंदच्या हृदयात पहिल्यांदा स्थान मिळवलं होतं. परंतु ते दोघं बोहल्यापर्यंत पोहोचू शकले नाहीत. यानंतर हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिली मॉडेल अभिनेत्री झीनत अमान हिच्यासाठी देव आनंदचे हृदय धडधडू लागलं. 70 च्या दशकातील अभिनेत्री झीनत अमानवर अनेक स्टार्सचा जीव जडला होता. त्यापैकी एक देव आनंद एक होते. देव आनंद जेव्हा तिच्याशी लग्न करू इच्छित होते तेव्हा झीनत फक्त 20 वर्षांची होती. 1971 मध्ये देव आनंद यांनी 'हरे रामा रहे कृष्णा' या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. या चित्रपटात झीनतनं देव आनंदच्या बहिणीची भूमिका साकारली होती. तुम्हालाआश्चर्य वाटेल की, आधी ही भूमिका अभिनेत्री मुमताजकडे गेली होती, मात्र तिनं ती करण्यास नकार दिला होता.
राज कपूरमुळे होऊ शकलं नाही लग्न
देव आनंद यांनी त्यांच्या 'रोमांसिंग विथ लाइफ' या आत्मचरित्रात ते झीनत अमानशी लग्न का करू शकले नाहीत, याचा खुलासा केला होता. देव आनंद यांनी त्यांच्या 'रोमान्सिंग विथ लाइफ' या आत्मचरित्रात लिहिले आहे की, "एक दिवस मला अचानक वाटू लागल की मी झीनत अमानच्या प्रेमात पडलो आहे, सांगण्यासारखं खूप काही होतं, त्यावेळी मी तिच्याबरोबर एका आलिशान हॉटेलमध्ये जेवण केलं होतं. सिटी मेट्रो सिनेमात 'इश्क-विश्क' चित्रपटाचा प्रीमियर झाला, पण इथे राज कपूरनं गर्दीत झीनतचं चुंबन घेतलं आणि तिला चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या. मी झीनतला माझी प्रमुख महिला मानली होती, पण राज कपूरनं झीनतचं चुंबन घेतल्यानं माझं हृदय तुटलं आणि मी तेथून शांतपणे परत आलो."
काय म्हणाल्या होत्या झीनत अमान?
जेव्हा झीनत अमानला याची माहिती मिळाली तेव्हा तिनं एका कार्यक्रमात याबद्दल सांगितलं होतं. झीनत म्हणाली होती की, "देव साहेबांचा आदर करणाऱ्यांपैकी मी देखील एक आहे, त्यांच्यामुळेच मी स्टार झाले, पण ते माझ्यावर प्रेम करतात हे मला माहीतही नव्हतं. माझ्याशी लग्न करण्याबद्दल देवजींना माझ्याबद्दल काय वाटतंय हेही मला माहीत नव्हतं." देव आनंद यांनी 1954 मध्येच कल्पना कार्तिकबरोबर लग्न केलं होतं. लग्न झाल्यानंतरही देव आनंद यांना अभिनेत्री झीनत अमानशी लग्न करायचं होतं.