मुंबई - अनादी काळापासून चित्रपटांतून प्रेम गीतं बघायला मिळत आहेत. अलीकडच्याा काळात प्रायव्हेट अल्बन्स निघू लागले ज्यात देखील रोमान्टिक गाण्यांचा भरणा बघायला मिळतो. नुकतेच संगीतकार प्रशांत नाकती यांचे "पदर" हे रोमँटिक गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले असून त्यात निक शिंदे आणि अनुश्री माने ही रोमँटिक जोडी दिसतेय. या गाण्यातून या जोडीचा रोमँटिक अंदाज आणि मराठमोळा ठसका पाहायला मिळतोय.
'पदर' या गाण्यात एका तरुणाच्या मनातील क्युट प्रेमकहाणी साकारली आहे, जिथे तो मुलगी पाहून तिच्यात हरवतो, आणि त्याच्या स्वप्नांत ती त्याची प्रेयसी बनते. या गाण्यातील या तरुणाच्या भावना, स्वप्न आणि प्रत्यक्ष जीवनात त्याची झालेली गोंधळाची स्थिती यामुळे प्रेक्षकांना एक मजेशीर अनुभव मिळतो. 'एरिक' आणि 'विन्मयी म्युझिक' प्रस्तुत या गाण्याची निर्मिती उत्तमरीत्या पार पडली आहे, तर दिग्दर्शनाची जबाबदारी प्रशांत नाकती यांनी सांभाळली आहे. प्रशांत नाकती आणि संकेत गुरव यांनी संगीताची देखील उत्तम सांगड घातली आहे. या गाण्याला सोनाली सोनावणे आणि केवल वलंज यांनी आपल्या सुरेल आवाजाने रंगत आणली आहे.
सध्या रोमँटिक गाण्यांचा जमाना आहे, आणि त्यातच मराठमोळ्या रंगात रंगलेलं एक नवीन गाणं प्रेक्षकांच्या मनात घर करतंय - 'पदर'. प्रशांत नाकती यांचं 'पदर' हे गाणं सोशल मीडियावर जोरदार पसंतीस उतरत आहे. 'पदर' गाण्यात निक आणि अनुश्री यांचा दिलखेचक अंदाज पाहायला मिळतोय, जो गाण्याला एक नवीन उंचीवर घेऊन जातो. 'पदर' गाण्यातील प्रियकराचं स्वप्न पूर्ण होणार का, याची उत्सुकता निर्माण झाली आहे. 'पदर' हे गाणं 'विण्मयी म्युझिक' यूट्यूब चॅनेलवर बघायला मिळेल.