मुंबई - Ilaiyaraaja biopic : साऊथचा सुपरस्टार धनुषने हिंदी चित्रपटसृष्टीतही आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वतःचं स्थान निर्माण केलंय. त्यानं अनेक हिंदी चित्रपटातून भूमिका करत आपली क्षमता सिद्ध केली आहे. त्याने आपल्या अभिनयाने हिंदी पट्ट्यातील प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. आता धनुष आणखी एका पॅन इंडिया चित्रपटाचा स्टार बनणार आहे. ही धनुषच्या चाहत्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते संगीतकार, संगीतकार, अरेंजर, ऑर्केस्ट्रेटर, गीतकार आणि गायक इलैयाराजा यांच्या बायोपिकची खूप काळापासून चर्चा होती. अखेर या चित्रपटाची घोषणा आज 20 मार्च रोजी करण्यात आली आहे. याशिवाय इलैयाराजा यांचा बायोपिक 'इलैयाराजा' मधील फर्स्ट लूक पोस्टरही समोर आलं आहे.
इलैयाराजाच्या भूमिकेत धनुषचं फर्स्ट लूक पोस्टर
साउथ सुपरस्टार कमल हासन आणि चित्रपटाचा मुख्य अभिनेता धनुष यांच्यासह 'द किंग ऑफ म्युझिक' इलैयाराजा स्वतःदेखील त्यांच्या बायोपिकच्या लॉन्चिंगला उपस्थित होते. यादरम्यान धनुष भावूक झालेला दिसला. इलैयाराजाचा बायोपिक हा पॅन इंडिया चित्रपट आहे. पुढील वर्षी 2024 मध्ये या चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार आहे. कनेक्ट मीडिया या चित्रपटाची निर्मिती करत आहे.
इलैयाराजाच्या बायोपिकसाठी धनुषला पहिली पसंती
यापूर्वी इलैयाराजाचा मुलगा युवन शंकर राजा म्हणाला होता की, ''त्याला त्याचे वडील इलैयाराजाच्या बायोपिकमध्ये धनुषला पाहायला आवडेल.'' धनुष पहिल्यांदाच बायोपिकमध्ये दिसणार आहे. अलीकडेच 'कॅप्टन मिलर' या चित्रपटात झळकलेला धनुष स्वतः इलैयाराजाचा मोठा चाहता आहे.
संगीतकार इलैयाराजा यांच्याबद्दल
80 वर्षीय इलैयाराजा यांनी आपल्या संगीत कारकिर्दीत 1000 चित्रपटांसाठी 7 हजार गाणी संगीतबद्ध केली आहेत आणि 20 हजारांहून अधिक मैफिलीत सादरीकरण केलं आहे. 1976 साली आपल्या कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या या ज्येष्ठ संगीतकाराने केवळ तामिळच नाही तर तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि हिंदी चित्रपटांसाठीही गाणी बनवली आहेत.
एका इंग्रजी चित्रपटासाठीही त्यांनी गाण्याची निर्मिती केली होती. 2010 मध्ये, त्यांना 'पद्मभूषण' आणि भारताचा दुसरा सर्वोच्च सन्मान 'पद्मविभूषण' (2018) देण्यात आला. इलैयाराजा यांनी आजवर पाच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकले आहेत, त्यापैकी तीन संगीत दिग्दर्शनासाठी आणि दोन बॅकग्राउंड स्कोअरसाठी जिंकले आहेत. रॉयल फिलहार्मोनिक ऑर्केस्ट्रा (लंडन) ने त्यांना 'मॅस्ट्रो' ही पदवी दिली होती.
हेही वाचा -