मुंबई - Punha Sade Made Teen Movie : अभिनेता म्हणून नावारुपाला आल्यानंतर अंकुश चौधरी आणि सचित पाटील या जोडीनं सतरा वर्षांपूर्वी 'साडे माडे तीन' या चित्रपटातून दिग्दर्शनक्षेत्रात पदार्पण केलं होतं. या चित्रपटात अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे या त्रिकूटाने साकारलेले 'कुरळे ब्रदर्स' प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून घेतले. हिंदी चित्रपटसृष्टीतला 'ऑल टाइम ग्रेट' कलाकृतींपैकी एक असलेल्या 'चलती का नाम गाडी' या अशोक कुमार, अनुप कुमार आणि किशोर कुमार या रील तसंच रियल लाइफ भावंडांच्या सहजसुंदर अभिनयाने नटलेल्या चित्रपटाचा 'साडे माडे तीन' हा रिमेक होता. आता चित्रपटरसिकांना 'पुन्हा एकदा साडे माडे तीन' च्या निमित्तानं 'कुरळे ब्रदर्स'चं धूमशान अनुभवायला मिळणार आहे.
'साडे माडे तीन'चा दुसरा भाग : लवकरच दिग्दर्शक अंकुश चौधरी 'पुन्हा एकदा साडे माडे तीन' या चित्रपटावर काम सुरु करणार आहे. नुकतीच या चित्रपटाची सोशल मीडियावरून घोषणा करण्यात आली आहे. 'पुन्हा एकदा साडे माडे तीन' चित्रपटात अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे आणि सिद्धार्थ जाधव हे कलाकारच प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय या चित्रपटात बाकी कुठले कलाकार असतील याबद्दल मात्र अंकुशने सस्पेन्स ठेवलं आहे. 'पुन्हा एकदा साडे माडे तीन' चित्रपटाची निर्मिती अमेय विनोद खोपकर पिक्चर्सच्या स्वाती खोपकर, निनाद बत्तीन यांच्यासह 'उदाहरणार्थ'चे सुधीर कोलते हे करणार आहेत.
दिग्दर्शक अंकुश चौधरी केल्या व्यक्त भावना : या चित्रपटाचं छायाचित्रण संजय जाधव करेल. येत्या सप्टेंबरपासून 'पुन्हा एकदा साडे माडे तीन' या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू होणार आहे. दरम्यान या नव्या प्रोजेक्टबद्दल अंकुश चौधरीने अतिशय उत्साहात माहिती दिली. '' पुन्हा एकदा 'साडे माडे तीन'ची घोषणा करताना अत्यंत आनंद होतोय. एखाद्या चित्रपटाचा दुसरा भाग येणे, हे खरंच खूपच जबाबदारीचं काम असतं. प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढतात. मला खात्री आहे, 'साडे माडे तीन'वर जसं प्रेक्षकांनी प्रेम केले, तसंच या चित्रपटावरही करतील. या भागात 'कुरळे ब्रदर्स'ची धमाल डबल झाली आहे. यात आता ते काय करणार, हे प्रेक्षकांना लवकरच कळेल. या चित्रपटाच्या निमित्तानं मी प्रथमच एव्हीके पिक्चर्स आणि उदाहरणार्थबरोबर काम करत असून यापूर्वी एव्हीके पिक्चर्सनं अनेक सुपरहिट चित्रपट मराठी सिनेसृष्टीला दिले आहेत. त्यामुळे यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव निश्चितच कमाल असेल. अमेय खोपकर, स्वाती खोपकर, निनाद बत्तीन, सुधीर कोलते यांची साथ लाभल्यानं हा चित्रपट निश्चितच एका वेगळया उंचीवर जाईल, यात शंका नाही. या टीमनं मराठी सिनेसृष्टीला एक वेगळेच स्थान मिळवून दिलं आहे."
चित्रपट सध्या निर्मितीवस्थेत आहे. त्यामुळे चित्रीकरण सुरु होणं, ते पूर्ण होऊन तो प्रदर्शित होईपर्यंत प्रेक्षकांना 'पुन्हा एकदा साडे माडे तीन' चा पुकारा करावा लागणार आहे.
हेही वाचा :