मुंबई Manoj Jarange Patils Biopic : महाराष्ट्रातील राजकारण मागील काही महिने मनोज जरांगे पाटील यांच्यामुळं ढवळून निघालंय. मराठा आरक्षण आंदोलनामुळं मनोज जरांगे पाटील यांचं नाव देशभरात तर पोहचलं, पण जगातही 'व्हू इज मनोज जरांगे पाटील?' असा प्रश्न विचारला जातोय. 'एक मराठा लाख मराठा' म्हणत त्यांनी काढलेले मोर्चे आणि मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून केलेला संघर्ष आता मोठ्या पडद्यावर दिसणार असून त्याचं नाव आहे 'संघर्षयोद्धा'. रोहन पाटील हे मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेत दिसणार असून, याचे दिग्दर्शन शिवाजी दोलताडे यांनी केलंय. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आलाय.
जरांगे पाटलांवर चित्रपट : मनोज जरांगे पाटील यांची भाषणं, उपोषणं, दौरे यांना प्रचंड प्रतिसाद मिळत आलाय. जरांगे पाटलांना मिळणाऱ्या प्रतिसादामुळं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसंच अन्य नेत्यांनाही त्यांची दखल घ्यावी लागली आहे. मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनात लाखो मराठा बांधव सहभागी होत असल्याचं आपण पाहिलंय. लाखोंचा सहभाग आणि गुलाल उधळत तयार झालेला माहौल हा टिजरमध्ये दिसून येतोय. त्यांची ही संघर्षयात्रा 'संघर्षयोद्धा' या सिनेमातून अधोरेखित होणार आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
महत्त्वाच्या कलाकारांच्या भूमिका : दिग्दर्शनाबरोबरच शिवाजी दोलताडे यांनी 'संघर्षयोद्धा' चं लेखन केले, असून निर्मितीही केली आहे. रामदास मेदगे, जान्हवी मनोज तांबे, दत्तात्रय लोहकरे कार्तिक दोलताडे , नर्मदा सिनेव्हिजन्स यांची यासाठी सहनिर्मिती आहे. संवाद आणि पटकथा डॉ. सुधीर निकम यांची असून यात रोहन पाटील, संदीप पाठक, सागर कारंडे, अरबाज शेख, मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, सुरभी हांडे, माधवी जुवेकर, विजय मिश्रा, विनीत भोंडे, सुनील गोडबोले, माधव अभ्यंकर, सोमनाथ अवघडे, किशोर चौगुले, सिद्धेश्वर झाडबुके यांच्या भूमिका आहेत.
२६ एप्रिलला चित्रपट होणार प्रदर्शित : मराठा आरक्षणाचा विषय सध्या सार्वाधिक चर्चेत असलेला विषय आहे. मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनामुळं महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघालंय. त्यांच्यावर बनत असलेल्या या चित्रपटात त्यांच्या आंदोलनामागची भूमिका, आक्रमक भाषा आणि घरची पार्श्वभूमीही पाहायला मिळणार आहे. अण्णा हजारेंनंतर त्यांच्या आंदोलनात इतक्या मोठ्या संख्येनं लोक सहभागी झाल्याने त्यांच्या नावाभोवती एक वलय निर्माण झालं आहे. 'संघर्षयोद्धा" हा चित्रपट येत्या २६ एप्रिलपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा -