मुंबई - साऊथ कोरियाचा लोकप्रिय अभिनेता सॉन्ग जे रिम यानं वयाच्या अवघ्या ३९ व्या वर्षी जगाचा अवेळी निरोप घेतला आहे. १२ नोव्हेंबर रोजी त्याचं निधन झाल्याच्या बातमीनं मनोरजंन क्षेत्रात खळबळ उडाली आहे. त्याच्या मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
अभिनेता सॉन्ग जे रिम हा सेऊलच्या सॉन्गडोंग शहरातील एका अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळून आला. त्याच्या मृतदेहाजवळ एक पत्रही आढळून आलंय. त्यानं आत्महत्या केली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
अभिनेता सॉन्ग जे रिम हा साऊथ कोरियाच्या फिल्म इंडस्ट्रीतला एक लोकप्रिय चेहरा बनला होता. 2009 मध्ये तो 'अॅक्ट्रेसेस' या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर झळकला होता. मात्र "द मून एम्ब्रेसिंग द सन" या चित्रपटातील त्याचा अभिनय प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहिला. या भूमिकेनं त्याची ओळख निर्माण झाली.
त्याने या मालिकेमध्ये लॉर्ड किम जे-वुन या विश्वासू अंगरक्षकाची भूमिका साकारली होती. या मालिकेच्या यशानंतर त्याने आणखी काही शोमध्ये काम केले. यामध्ये “टू वीक्स” या मालिकेत त्यानं कोल्ड ब्लडेड किलरची भूमिका केली होती. “अनकाइंड लेडीज” (2015), “सिक्रेट मदर” (2018), “आय वॉना हिअर युवर सॉन्ग” (2019), “कॅफे मिनामडांग” (2022) आणि अलीकडेच “माय मिलिटरी व्हॅलेंटाईन” (2022) या शोमध्ये त्यानं काम केलं होतं.
वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातम्यामध्ये तो मृतावस्थेत आढळला त्या घटनास्थळी दोन पानी पत्रही सापडले आहे. त्यामुळे त्यानं आत्महत्या केली असल्याचा अंदाज व्यक्त केला जातो. परंचु, मृत्यूचे नेमके कारण अद्याप पुष्टी झालेले नाही. पोलीस घटनास्थळी पोहचून त्याच्या मृत्यूची चौकशी करत आहेत. सॉन्ग जे रिम यांच्या अकाली एक्झीटमुळं त्याचे तमाम चाहते दुःखी झाले आहेत. 14 नोव्हेंबर रोजी त्याच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.