मुंबई Emergency Movie : कंगना रणौत स्टारर 'इमर्जन्सी' हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे. आता या चित्रपटात सेन्सॉर बोर्डानं काही बदल सुचवले आहेत. हे बदल करण्यास कंगना रणौतनं सहमती दर्शवली आहे. 'इमर्जन्सी' चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाचं प्रमाणपत्र अद्याप मिळालेलं नसल्यानं, हे प्रमाणपत्र मिळावं यासाठी निर्देश देण्याच्या मागणीसाठी चित्रपटाच्या निर्मात्यांतर्फे मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. 'इमर्जन्सी' चित्रपटातील आक्षेपार्ह संवाद वगळण्यास सेन्सॉर बोर्डानं आदेश दिले आहेत. यावर कंगनाही राजी असल्याची माहिती वकिलांतर्फे मुंबई उच्च न्यायालयात देण्यात आली आहे.
'इमर्जन्सी' चित्रपटात होणार बदल : मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बी. पी. कुलाबावाला आणि न्यायमूर्ती फिरदौश पुनीवाला यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. आता लवकरच कंगना रणौतच्या 'इमर्जन्सी'मध्ये बदल झालेला दिसेल. सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC) च्या मंजुरीमुळे कंगना रणौतच्या 'इमर्जन्सी' चित्रपटाच्या रिलीजला अडथळा निर्माण झाला होता. 'इमर्जन्सी' या चित्रपटामध्ये इंदिरा गांधींच्या राजवटीत आणीबाणी कशी लादली गेली होती, याबद्दल दाखवण्यात आलं आहे. अलीकडे, निर्मात्यांनी रिव्हाईजिंग कमिटीनं सुचविलेल्या बदलांना सहमती देऊन चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी पावलं उचलली आहेत.
सेन्सॉर बोर्डावर कंगनाची टीका : झी स्टुडिओज या निर्मिती संस्थेनं चित्रपटाच्या प्रमाणपत्राबाबत मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर, याप्रकरणी कोर्टात चर्चा झाली होती. आता दिलेल्या सूचनेप्रमाणं सेन्सॉर बोर्डाला गुरुवार, 3 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीपूर्वी प्रतिसाद देणं अपेक्षित आहे. दरम्यान गेल्या महिन्यात चित्रपटाला प्रमाणपत्र न मिळल्यानं रिलीजसाठी विलंब झालाय. यानंतर कंगनानं सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली होती. तिनं सेन्सॉर बोर्डावर टीका केली होती. चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबतही विविध गटांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. या महिन्याच्या सुरुवातीला, शीख संघटनांनी 'इमर्जन्सी'वर आक्षेप घेतला होता. शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समिती (SGPC) आणि अकाल तख्त यांनी या चित्रपटावर बंदीची मागणी केली होती.
'इमर्जन्सी' चित्रपटाबद्दल : या चित्रपटात कंगनानं इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे. याशिवाय 'इमर्जन्सी' चित्रपटात अनुपम खेर, मिलिंद सोमण, महिमा चौधरी आणि श्रेयस तळपदे हे कलाकार आहेत. या चित्रपटात श्रेयसनं अटल बिहारी वाजपेयींची भूमिका साकारली आहे, तर अनुपम खेर हे जयप्रकाश नारायण यांच्या भूमिकेत आहेत. दिवंगत सतीश कौशिक हे माजी उपपंतप्रधान जगजीवन राम यांच्या भूमिकेत दिसणार आहेत.
हेही वाचा :