हैदराबाद - Launch of Bujji Robot at Ramoji Film City : 'कल्की 2898 एडी' हा या वर्षातील सर्वात जास्त प्रतीक्षा असलेला चित्रपट आहे. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी अखेर त्यांचा विशेष रोबोट 'बुज्जी' आणि मुख्य पात्र 'भैरव' यांचा लूक हैदराबाद शहरातील रामोजी फिल्म सिटीमध्ये आयोजित केलेल्या प्री-रिलीज कार्यक्रमात उघड केला आहे. मागील काही दिवसांपासून चाहत्यांनी मोठ्या प्रमाणावर अपेक्षा निर्माण केल्यानंतर या रोबोटचं लॉन्चिंग करण्यात आलं आहे. 'बुज्जी' हा रोबोट नाग अश्विनच्या कल्कि चित्रपटाचा एक अविभाज्य भाग आहे.
चित्रपटाचं कथानक बुज्जी भोवती फिरतं, एक वेगळे व्यक्तिमत्व असलेल्या या रोबोटला कीर्ती सुरेशनं आवाज दिला आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी बुधवारी आरएफसी येथे खास डिझाइन केलेल्या कारचे लॉन्चिंग केलं. शिवाय, प्रभासनं त्याच्या 'खास स्टाईल'मध्ये बुज्जीची ओळख करून देणारा एक संक्षिप्त व्हिडिओ पोस्ट केला होता.
खास बनवलेली ही कार चालवत प्रभास स्टाईलमध्ये कार्यक्रमात पोहोचला. प्रेक्षकांशी बोलताना प्रभासनं अमिताभ बच्चन आणि कमल हासन आणि सुंदर दीपिका पदुकोण आणि दिशा पटानी यांचा विशेष उल्लेख करून 'कल्की 2898 एडी'च्या त्याच्या सर्व सहकलाकारांचे आभार मानले.
प्रभास म्हणाला, "अमिताभ आणि कमल हासन यांच्या अभिनयानं संपूर्ण भारताला प्रेरणा मिळाली आहे. अशा महान अभिनेत्यांबरोबर काम करण्याची संधी मिळाल्यानं मी भाग्यवान आहे. अमिताभ बच्चन यांच्यासारखा अभिनेता आपल्या देशात आहे याचा आम्हाला अभिमान आहे. मी लहान असताना कमल हासन सरांचा सागरसंगम पाहिला होता आणि त्याच्यासारखा ड्रेस पाहिजे म्हणून आईकडं हट्टही केला होता. आणखी एक सुंदर अभिनेत्री म्हणजे, दीपिका पदुकोण. तिच्याबरोबर काम करण्याचा अनुभव चांगला होता."
आता, इव्हेंटचे व्हिज्युअल इंटरनेटवर व्हायरल होत असल्यानं, सोशल मीडिया युजर्स वापरलेल्या तंत्रज्ञानाबद्दल आश्चर्यचकित झाले आहेत. बुज्जीच्या परिचयावर आणि टीझरवर प्रतिक्रिया देताना, एका युरनं लिहिलं: "नेक्स्ट लेव्हल स्टफ. यावेळी पॅन इंडिया नाही, हे पॅन वर्ल्ड आहे." आणखी एकाने लिहिलं: "या चित्रपटात भारतीय चित्रपट बदलण्याची क्षमता आहे." एका चाहत्यानं लिहिलं: "माझा रिबेल स्टार प्रभास प्रत्येक रेकॉर्ड मोडेल याची खात्री आहे."
या कार्यक्रमात रामोजी फिल्म सिटीच्या एमडी विजयेश्वरी, दिवंगत कृष्णराजू यांच्या पत्नी श्यामला देवी, निर्मात्या स्वप्ना दत्त, प्रियांका दत्त आणि इतर सहभागी झाले होते. नाग अश्विन दिग्दर्शित 'कल्की 2898 एडी' या सायन्स फिक्शन चित्रपटाच्या मुख्य कलाकारांमध्ये प्रभास, दीपिका, दिशा, अमिताभ आणि कमल यांचा समावेश आहे. चित्रपटाचं कथानक गुप्त ठेवण्यात आलं असलं तरी अमिताभ अश्वथामाची भूमिका साकारत आहेत, हे नुकतेच उघड झालं आहे. 27 जून रोजी हा चित्रपट अनेक भाषांमध्ये थिएटरमध्ये उपलब्ध होईल.
हेही वाचा -