मुंबई - VEDAA CBFC DELAY : जॉन अब्राहम आणि शर्वरी वाघ स्टारर 'वेदा'च्या निर्मात्यांनी चाहत्यांसाठी सेन्सॉर बोर्डाकडून चित्रपटाच्या प्रलंबित रिव्ह्यू सर्टिफिकेटबद्दल अपडेट शेअर केलं आहे. चित्रपट अद्याप सेन्सॉर बोर्ड ऑफ पिक्चर सर्टिफिकेशन (CBFC) च्या मंजुरीच्या प्रतीक्षेत असल्याचं यात सांगण्यात आलंय. चित्रपटाचे दिग्दर्शक निखिल अडवाणी यांनी गुरुवारी इंस्टाग्रामवर ही बातमी शेअर केली आणि अधिकाऱ्यांना हा अनावश्यक विलंब टाळण्याबद्दल विनंती केली आहे.
"वेदा चित्रपटाचे निर्माते म्हणून आम्हाला चाहत्यांना आणि समर्थकांना सांगावसं वाटतंय की आमच्या बाजून सर्व गोष्टींची पूर्तता करुनही अद्याप आम्हाला क्लिएरन्स मिळालेला नाही आणि सीबीएफसी कडून सर्टिफिकेटही मिळालेलं नाही.", असं इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलंय.
प्रक्रियेबद्दल तपशील शेअर करतान वेदा चित्रपटाच्या निर्मात्यांनी दावा केला आहे की, "आम्ही प्रोटोकॉलचे पालन केलं आणि आठ आठवड्यांच्या रिलीजच्या अंतिम मुदतीपूर्वी प्रमाणपत्रासाठी अर्ज केला. आमचा चित्रपट 25 जून रोजी सेन्सॉर बोर्डासाठी प्रदर्शित करण्यात आला. यानंतर, आम्हाला सुधारित समितीच्या पुनरावलोकनाकडे नेण्यात आलं. तेव्हापासून परीक्षण समितीचे मुद्दे किंवा आक्षेप काय होते याचं स्पष्टीकरण दिलेलं नाही, आम्ही या विनाकारण विलंबानंतरही धीरानं वाट पाहत आहोत आणि आम्हाला विश्वास आहे की सीबीएफसी हे काम करेल."
संबंधित अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर या समस्येची चौकशी करून त्यावर तातडीनं उपाययोजना करावी, अशी विनंतीही निर्मात्यांनी केली आहे. "१५ ऑगस्ट ही आमच्यासाठी एक खास तारीख आहे. आम्ही आमचा चित्रपट जॉन अब्राहम आणि निखिल अडवाणी यांच्या चाहत्यांपर्यंत पोहोचवण्याच्या धडपडीत आहोत. यापूर्वी आमचा सत्यमेव जयते आणि बाटला हाऊस हा चित्रपट याच तारखेला प्रदर्शित झाला होता."
निर्मात्यांनी यामध्ये शेवटी म्हटलंय की, "वेदा हा सध्याच्या घडामोडींनी प्रेरित असलेला एक शक्तिशाली आणि पूर्णपणे मनोरंजक चित्रपट आहे. आम्हाला विश्वास आहे की तो प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यास पात्र आहे. आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे की आम्ही तुमची भेट घेऊन यावर चर्चा करु शकू..."
निखिल अडवाणी दिग्दर्शित आणि असीम अरोरा लिखित वेदाची निर्मिती झेड स्टुडिसाठी उमेश केआर बन्सल, मोनिशा अडवाणी, मधु भोजवानी आणि जॉन अब्राहम यांनी केली आहे, मिनाक्षी दास या चित्रपटाच्या सह-निर्मात्या आहेत.