मुंबई - ISPL Final: मेगास्टार अमिताभ बच्चन यांना शुक्रवारी सकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याच्या बातमीनंतर चाहत्यांच्या मनात अनेक शंका निर्माण झाल्या होत्या. दुपारनंतर त्यांना कोकिलाबेन अंबानी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्याची बातमी आल्यानंतर सर्वांचाच जीव भांड्यात पडला. त्यानंतर बच्चन घरीच विश्रांती घेतील असा अंदाज केला जात असताना संध्याकाळी मात्र ते थेट ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये क्रिकेटचा सामना एन्जॉय करताना दिसल्यामुळे आश्चर्य व्यक्त होतंय.
इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगचे सामने दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये खेळले जात होते. अमिताभ बच्चन यांच्याकडे आयएसपीएल ( ISPL ) मधील 'माझी मुंबई' संघाची मालकी आहे. ही भारतातील पहिली-वहिली टेनिस बॉल क्रिकेट लीग आहे ज्याचे भव्य सामने स्टेडियममध्ये खेळवले जात आहेत. 'माझी मुंबई'ने गुरुवारी 'चेन्नई सिंगम्स'चा ५८ धावांनी पराभव करत स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. टायगर्स ऑफ कोलकाता संघाविरुद्ध 'माझी मुंबई' संघाचा फायनल सामना पार पडला. आपल्या संघाच्या सहकाऱ्यांमध्ये उत्साह भरण्यासाठी अमिताभ यांनी घरी विश्रांती न घेता मैदान गाठल्याचे दृष्य पाहायला मिळाले.
अमिताभ बच्चन यांनी अतिम फेरीचा हा सामना मुलगा अभिषेक बच्चन आणि सचिन तेंडूलकर यांच्यासह पाहिला. यावेळी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आशिष शेलारही उपस्थित होते. अमिताभ यांचा संघ माझी मुंबईने हा सामना गमवला. त्यांच्या संघाने 10 षटकात 9 गड्यांच्या मोबदल्यात 58 धावा केल्या. 'माझी मुंबई' संघाचा एकही फलंदाज खेळपट्टीवर टिकून राहिला नाही. विजय ढवळे या एकाच फलंदाजाने दोन आकडे गाठले आणि केवळ 13 धावा नावावर केल्या. 'टायगर्स ऑफ कोलकाता' संघाच्या मुन्ना शेख आणि प्रथमेश पवार यांनी सलामीला येऊन जोरदार टोलेबाजी केली आणि एकही बळी जाऊ न देता सातव्या षटकातच 62 धावा काढून अंतिम सामना सहज जिंकला.
अमिताभ बच्चन यांनी कालचा सामना एन्जॉय करताना खेळाडूंचे कौतुक केले. कालच्या सामन्याचा अनुभव सांगताना त्यांनी आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले : "संध्याकाळी आयएसपीएल पाहतानाचा अनुभव किती छान होता, महान सचिन बरोबर बसून छान वेळ घालवला आणि क्रिकेटबद्दलच्या त्याच्या अतुलनीय ज्ञानाबद्दल जाणून घेणे, प्रशंसा करणे हा किती विनम्र अनुभव होता." अशा आशयाचे कॅप्शन बच्चन यांनी लिहिले आहे.
कामाच्या आघाडीवर अमिताभ बच्चन आगामी 'कल्की 2898 एडी' या साय-फाय अॅक्शन थ्रिलर चित्रपटात दीपिका पदुकोण आणि प्रभास यांच्या बरोबर दिसणार आहेत. त्यांच्याकडे 'सेक्शन 84' हा कोर्टरूम ड्रामा चित्रपटही आहे.
दुसरीकडे अभिषेक बच्चनने अलिकडेच सैयामी खेर आणि अंगद बेदी यांच्यासह 'घूमर' या स्पोर्ट्स ड्रामा चित्रपटात काम केले होते. आर बाल्की दिग्दर्शित या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
हेही वाचा -