मुंबई - संगीतकार इलैयाराजा यांनी 15 डिसेंबर रोजी तामिळनाडूच्या विरुधुनगर जिल्ह्यातील श्रीविल्लीपुथूर अंडाल मंदिरात भेट दिली आणि त्यांच्या दिव्या पशुराम या नव्या गाण्याचं लॉन्चिंग केलं. यावेळी त्यांच्या बरोबर सदागोपा रामानुज जेयार आणि श्री श्री सतगोपा रामा हे धार्मिक व्यक्ती होते. त्यांचे या मंदिरात भव्य स्वागत करण्यात आलं. मात्र मंदिराच्या अर्थ मंडपात जाण्यापासून इलैयाराजा यांना रोकण्यात आल्याची चर्चा सुरू झाली आहे.
मोठ्या प्रमाणावर प्रसारित झालेल्या एका व्हिडिओमध्ये, इलैयाराजा जीयर्सच्या मागे मंदिरात जाताना दिसतात. परंतु धार्मिक नेते आतमध्ये असताना त्याला अर्थ मंडपमच्या उंबरठ्यावर थांबवलं जातं. मंदिरात प्रवेश करण्यास अडथळा तयार झाल्यानंतर , इलैयाराजा यांनी मंदिराच्या सूचनांचं पालन केलं आणि ते मंदिराच्या उंबऱ्याच्या बाहेर जाऊन उभं राहिले. यामुळे काही लोक म्हणत आहेत की संगीतकार इलैयाराजा यांना भेदभवाची वागणूक देण्यात आली आहे.
என்னை மையமாக வைத்து சிலர் பொய்யான வதந்திகளைப் பரப்பி வருகிறார்கள். நான் எந்த நேரத்திலும், எந்த இடத்திலும் என்னுடைய சுய மரியாதையை விட்டுக் கொடுப்பவன் அல்ல, விட்டுக்கொடுக்கவும் இல்லை. நடக்காத செய்தியை நடந்ததாகப் பரப்புகின்றார்கள். இந்த வதந்திகளை ரசிகர்களும், மக்களும் நம்ப வேண்டாம்.
— Ilaiyaraaja (@ilaiyaraaja) December 16, 2024
दरम्यान, इलैयाराजा यांनीही सोशल मीडियाच्या माध्यामताून अशी घटना घडली नसल्याचं म्हटलंय. अफवावर विश्वास न ठेवण्याचं आवाहनही त्यांनी केलंय. त्यांनी एक्स सोशल मीडियावर लिहिलेल्या तमिळ पोस्टमध्ये म्हटलंय की, "काही व्यक्ती माझ्याबद्दल निराधार अफवा पसरवत आहेत. मी एक अशी व्यक्ती आहे जी सर्वांपेक्षा स्वाभिमानाला महत्त्व देते आणि मी त्यात तडजोड करणार नाही. ते खोट्या बातम्या पसरवत आहेत. मी माझ्या चाहत्यांना आणि जनतेला या अफवांवर न विश्वास ठेवण्याची विनंती करतो."
या घटनेवर प्रतिक्रिया देताना, अंडाल मंदिराच्या हिंदू धार्मिक धर्मादाय विभागाचे कार्यकारी अधिकारी सक्कराई अम्मल यांनी स्पष्ट केलं की, मंदिराच्या प्रथा दीर्घकाळापासून सुरू आहेत आणि याचं पालन सर्वजण करत असतात. उत्सव मूर्ती असलेल्या जागेमध्ये फक्त जेयरांना प्रवेश दिला जातो. त्यांना या मंदिरात विशेष धार्मिक दर्जा आहे. नियमावर जोर देताना त्यांनी पुढं सांगितलं की, कितीही मोठी व्यक्ती असली तरी ही प्रथा परंपरा सर्व भक्तांसाठी लागू आहे.
ऐतिहासिक महत्त्व असलेलं अंडाल मंदिर हे 7व्या शतकातील तमिळ कवी-संत आंदल यांच्याशी संबंधित असून हे मंदिर भगवान विष्णूला समर्पित आहे. या घटनेनं मीडियाचे लक्ष वेधल्यानंतर मंदिर अधिकाऱ्यांनी आश्वासन दिलं आहे की कोणताही भेदभाव झाला नाही आणि पाळलेल्या प्रथा मंदिराच्या चालीरीतींनुसार आहेत.