मुंबई - नवीन वर्ष जवळ येत असताना 2024 मध्ये भारतातील सर्वाधिक लोकप्रिय कलाकारांच्या यादीत तृप्ती डिमरीनं अव्वल स्थान प्राप्त केलं आहे. शाहरुख खान, रणबीर कपूर किंवा दीपिका पदुकोण यासारख्या दिग्गज कलाकारांऐवजी तृप्ती डिमरी या उत्तराखंडमध्ये जन्मलेली अभिनेत्रीनं 2024 साठी भारतातील सर्वात लोकप्रिय चित्रपट स्टार म्हणून अव्वल स्थान पटकावले आहे.
कला, बुलबुल, अॅनिमल, लैला मजनू, आणि भूल भुलैया 3 मधील उत्कृष्ट भूमिकांमुळे तृप्ती प्रसिद्धीस आली. या भूमिकांनी तिला शाहरुख खान, रणबीर कपूर, प्रभास आणि आलिया भट्ट यांच्यासह बॉलिवूडमधील काही मोठ्या नावांपेक्षा पुढे नेलं. 30 वर्षीय तृप्तीचं नंबर 1 वर पोहोचणे हा भारतीय चित्रपटसृष्टीतील एका व्यापक ट्रेंडचा एक भाग आहे.
तिच्याबरोबर, 29 वर्षीय इशान खट्टर यानं तिसरं स्थान मिळवलंय. बियाँड द क्लाऊड (2017) आणि ए सुटेबल बॉय (2020) मधील त्याच्या अभिनयासाठी ओळखल्या जाणाऱ्या ईशानने द परफेक्ट कपल (Netflix) या आंतरराष्ट्रीय मालिकेतील त्याच्या भूमिकेनं त्याचा जागतिक चाहता वर्ग वाढवला आहे. यामध्ये तो निकोल किडमनच्या विरुद्ध भूमिका साकारत आहे. 'मुंज्या', 'महाराज' आणि 'वेदा' यांसारख्या यशस्वी चित्रपटातून आपला ठसा उमटवणाऱ्या शर्वरी वाघसारख्या नव्या चेहऱ्याचा उदय या वर्षी पाहायला मिळाला.
IMDb च्या वतीनं संकलित केलेल्या या क्रमवारीत भारतीय चित्रपटांचे सतत विकसित होत असलेलं स्वरूप दिसून येते. IMDb चा डेटा जगभरातील 250 दशलक्ष मासिक व्हिजीटर्सकडून येतो, ज्याच्या आधारे ही क्रमवारी ठरवली जाते. 2024 साठी ही कलाकारांची यादी प्रादेशिक सिनेमांसह विविध उद्योगांमधील ताऱ्यांच्या वाढत्या लोकप्रियतेवर प्रकाश टाकणारी आहे.
गेल्या वर्षी 'पठाण', 'जवान' आणि 'डंकी'च्या यशानंतर 2023 मध्ये टॉप 10 च्या यादीत शाहरुख खाननं अव्वल स्थान मिळविलं होतं. 2024 ची यादी अधिक वैविध्यपूर्ण आहे. शाहरुख खान आणि ऐश्वर्या राय बच्चन सारखे दिग्गज तारे त्यांच्या कायम लोकप्रियतेमुळे साप्ताहिक क्रमवारीत दिसत राहिले तरी या वर्षी नव्या प्रतिभावान कलाकारांनी प्रेेक्षकांचं लक्ष वेधलं आहे.
मंकी मॅनमधून हॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी आणि 'लव्ह', 'सितारा' या चित्रपटात झळकलेली शोभिता धुलिपाला तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही देखील चर्चेत आली. नागा चैतन्यशी होत असलेल्या तिच्या लग्नामुळे ती बरीच चर्चेत राहिली. आयएमडीबीच्या यादीत शोभिताने पाचवे, तर सामंथा आठव्या क्रमांकावर आहे. अॅमेझॉन प्राइम सिरीज 'सिटाडेल हनी बनी'मध्ये सामंथा दिसली होती. सामांथाच्या आरोग्याच्या समस्या आणि नागा चैतन्यसोबत घटस्फोटानंतरच्या तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलच्या चर्चांमुळे ती सतत चर्चेत राहिली.