मुंबई - मराठी महिला केंद्रीत चित्रपटांना प्रेक्षक नेहमीच साथ देत आला आहे. अलीकडच्या काळात रिलीज झालेला प्रसाद ओक दिग्दर्शित 'हिरकणी', अनंत महादेवन दिग्दर्शित 'मी सिंधुताई सपकाळ' हा चरित्रपट, दोन लठ्ठ महिलांची गोष्ट सांगणारा 'वजनदार', भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर 'आनंदी गोपाळ' हा पुरस्कार विजेता चित्रपट, 'बकेट लिस्ट' हा माधुरी दीक्षित नेनेंचा चित्रपट असो की 'झिम्मा' आणि 'बाईपण भारी देवा' अशा चित्रपटांनी चित्रपट रसिकांच्या पसंतीची पावती मिळवली. या पार्श्वभूमीवर 'जागतिक महिला दिना'च्या पूर्वसंध्येला व्हॉयलेट फ्लेम मोशन पिक्चर्स निर्मित 'गुलाबी' या चित्रपटाची नुकतीच सोशल मीडियावर घोषणा करण्यात आली आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
अभ्यंग कुवळेकर दिग्दर्शित या चित्रपटाचे स्वप्नील भामरे, अभ्यंग कुवळेकर, शीतल शानभाग आणि सोनाली शिवणीकर हे निर्माते आहेत. तर या चित्रपटात श्रुती मराठे, मृणाल कुलकर्णी, अश्विनी भावे, सुहास जोशी, शैलेश दातार, अभ्यंग कुवळेकर आणि निखिल आर्या यांच्या प्रमुख भूमिका आहेत. मराठी आणि हिंदीत स्वतंत्र ठसा उमटवणारी अश्विनी भावे या चित्रपटाच्या निमित्ताने बऱ्याच काळानंतर रुपेरी पडद्यावर दिसणार आहे.
चित्रपटाच्या पोस्टरवरून, नावावरून हा चित्रपट तीन मैत्रिणींची कथा यामध्ये दाखवण्यात आल्याचं दिसतं. यामध्ये तिघींचीही पार्श्वभूमी वेगळी आहे. पोस्टरमध्ये गुलाबी शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जयपूर शहरातील हवामहल पॅलेसचा फोटोही दिसत आहे. त्यामुळे चित्रपटाचं कथानक जयपूरात आकाराला येत असावं, असं वाटण्याला पुरेपुर जागा आहे. एकूण चित्रपटाची तगडी टीम पाहता यात काहीतरी वेगळं पाहायला मिळणार, अशी अपेक्षा चित्रपटरसिक नक्कीच करु शकतात.
चित्रपटाबद्दल दिग्दर्शक अभ्यंग कुवळेकर म्हणतात, '' आज आमच्या चित्रपटाची घोषणा होतेय. चित्रपट स्त्रीप्रधान असला तरी यात मनोरंजनही आहे. हळूहळू चित्रपटातील अनेक गोष्टी समोर येतीलच. सध्या तरी एकच सांगेन अतिशय प्रतिभाशाली अभिनेत्री यात अभिनय करत आहेत.''
यापूर्वी 'पिंक' असे शीर्षक आणि तीन मुलींची थरारक कथा असलेला चित्रपट हिंदीमध्ये आला होता. यामध्ये अमिताभ बच्चन यांनी खूप प्रभावी भूमिका साकारली होती. अनिरुद्ध रॉय चौधरी दिग्दर्शित या चित्रपटाला 64 व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा सनमानही मिळाला होता. त्यामुळे मराठीत बनणाऱ्या या 'गुलाबी' चित्रपटाबद्दलची उत्कंठा वाढीस लागलेली आहे.
हेही वाचा -