मुंबई - अमेरिका स्थित उद्योजक विनोद मलगेवार यांच्या गोल्डन गेट मोशन पिक्चर्स या प्रतिष्ठीत प्रॉडक्शन हाऊसने भारतात चित्रपट निर्मिती करण्यासाठी बहुभाषिक स्क्रिप्ट डील पक्की केली आहे. यासाठी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त दिग्दर्शक आणि पटकथा लेखक सचिन कुंडलकर आणि तेजस मोडक यांच्या बरोबर हातमिळवणी केली आहे.
दोघांमध्ये झालेल्या कारारानुसार सुरुवातीला तीन चित्रपटाच्या कथेबाबत डील निश्चित झाले आहे. या अंतर्गत पहिल्या चित्रपटाचे काम पूर्ण झाले आहे. 'बेबिंका' हा पहिला चित्रपटाचे शूटिंग अलीकडेच संपले असून याचे पोस्ट प्रॉडक्शन सुरू झालं आहे. हा चित्रपट सचिन कुंडलकर यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता वैभव तत्ववादी आणि सोनाली कुलकर्णी हे दोन हिंदी चित्रपटासह मराठी पडद्यावरील मोठे कलाकार प्रमुख भूमिका साकारत आहेत.
काही दिवसापूर्वी अभिनेता वैभव तत्ववादी यानं त्याच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करुन 'बेबिंका' चित्रपटाचं शूटिंग सुरू असल्याचं कळवलं होतं. त्यानं आपल्या पोस्टमध्ये लिहिलं होतं, "ज्या दिवशी तुम्ही नवीन प्रोजेक्टची घोषणा करता तेव्हा तुमचा वाढदिवस आणखी खास बनतो. राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक सचिन कुंडलकर दिग्दर्शित आणि विनोद मालगेवार निर्मित, गोल्डन गेट मोशन पिक्चर्स निर्मित, 'बेबिंका' या माझ्या पुढील हिंदी चित्रपटाची घोषणा करताना मला खूप आनंद होत आहे. अप्रतिम प्रतिभावान सोनाली कुलकर्णी हिच्याबरोबर स्क्रीन शेअर करण्याचा हा एक अद्भुत अनुभव होता. मला आशा आहे की तुम्हाला हा चित्रपट आवडेल.तुमच्या सर्व प्रेमळ शुभेच्छांसाठी खूप खूप धन्यवाद. कृपया BEBINKA ला देखील तुमच्या शुभेच्छा पाठवा.," असं वैभवनं लिहिलं होतं.
अभिनेता वैभव तत्ववादीचा 25 सप्टेंबर रोजी त्याचा 36 वा वाढदिवस साजरा झाला. त्यावेळी या चित्रपटात काम करत असल्याचं त्यानं चाहत्यांना कळवलं होतं. 'बेंबिका' चित्रपटाचं कथानक कसं आहे, या चित्रपटात आणखी कोण कलाकार आहे, या चित्रपटाचं रिलीज कधी आहे याविषयीचा तपशील अद्यापही गुलदस्त्यात आहे. परंतु दिग्दर्शक म्हणून सचिन कुंडकर आणि वैभव तत्ववादी, सोनाली कुलकर्णी असे कलाकार यामध्ये असल्यामुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता निश्चितपणे ताणली गेली आहे.