मुंबई - संदीप रेड्डी वंगा सध्या त्याच्या डिसेंबर 2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या त्याच्या 'अॅनिमल' चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे. या चित्रपटात रणबीर कपूर, रश्मिका मंदान्ना, तृप्ती दिमरी, बॉबी देओल आणि अनिल कपूर प्रमुख भूमिकेत होते आणि या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही तुफान कमाई केली होती. तिकीट बारीवर जमलेल्या गल्ल्यामुळे तो समाधानी असला तरी चित्रपट हा पुरुषी वर्चस्वाच्या विचारणीचे समर्थन करतो, अशी टीकाही त्याला सहन करावी लागली.
कंगना राणौत ही त्या सेलिब्रिटींपैकी एक होती ज्यांनी या चित्रपटावर बोचरी टीका केली होती. दिग्दर्शक संदीपने अलिकडे दिलेल्या एका मुलाखतीत यावर भाष्य केलं. कंगनाने केलेल्या टीकेबद्दल विचारले असता त्याने तिच्या मताचे स्वागत केले. तिच्या या प्रतिकुल कमेंटमुळे तो चिडला नाही, कारण त्याच्या मते त्याला तिचा अभिनय आनंद देऊन जातो त्यामुळे तिची टीका त्याला भयंकर वाटत नाही.
संदीप रेड्डी वंगा पुढे म्हणाला की, "एकाद्या फिल्मसाठी कंगना रणौत मला योग्य वाटत असेल तर मी तिच्याकडे जाईन आणि तिला कथा सांगेन. मला तिचा क्वीन आणि इतर चित्रपटातील परफॉर्मन्स अगदी मनापासून आवडला होता. त्यामुळे तिने अॅनिमल चित्रपटाबद्दल काही नकारात्मक मत मांडलं असेल तर त्याचं मला काही वाटत नाही. यामुळे मी चिडलेलोही नाही कारण मी तिचं इतकं काम पाहिलेलं आहे की मला वाईट वाटलं नाही."
संदीपचा हा मुलाखतीचा व्हिडिओ कंगनाने तिच्या X वर शेअर केला आहे. याबद्दल ती म्हणते, "समीक्षा आणि टीका एक असत नाही, प्रत्येक कलेची समीक्षा आणि चर्चा झाली पाहिजे, ही एक सामान्य गोष्ट आहे. संदीपजीने ज्या प्रकारे माझ्या समीक्षेवर हसतपणे माझ्याबद्दल आदर व्यक्त करुन भाव व्यक्त केला, यामुळे असं म्हणता येईल की, ते फक्त केवळ मर्दाना चित्रपटच बनवत नाहीत तर त्यांचे वागणेही मर्दाना आहे. धन्यवाद सर."
कंगनाने पुढे विनोदाने म्हटले की, त्याने तिला भूमिकेसाठी कास्ट करू नये कारण त्याच्या चित्रपटातील माचो हिरो स्त्रीवादी होतील आणि त्याचे चित्रपट देखील फुकट जातील. कंगना पुढे म्हणाली की इंडस्ट्रीला त्याची गरज आहे कारण तो ब्लॉकबस्टर चित्रपटांची निर्मिती करतो.
एका चाहत्याला उत्तर देताना, रणौतने X वर लिहिले, "माझ्या चित्रपटांसाठी पेड निगेटिव्हिटी जबरदस्त आहे, मी आतापर्यंत खूप संघर्ष करत आली आहे, परंतु प्रेक्षक देखील महिलांना अशा चित्रपटांना प्रोत्साहन देत आहेत जिथे त्यांना लैंगिक वस्तूंसारखे वागवले जाते, बूट चाटायला भाग पाडले जाते, ही गोष्ट आपले जीवन स्त्री सशक्तीकरण चित्रपटांसाठी समर्पित करत असलेल्या व्यक्तीसाठी अत्यंत निराशाजनक आहे. येत्या काही वर्षांत करिअर बदलू शकते, माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम वर्षे सार्थकी लावायची आहेत.”
हेही वाचा -