मुंबई Dharmaveer 2 Trailer : मागील काही महिन्यांपासून 'धर्मवीर 2' सिनेमाची जोरदार चर्चा सुरु आहे. या सिनेमाच्या टीझरचीही सोशल मीडियावर प्रचंड चर्चा झाली. त्यातच आता या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. 'साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट' अशी या सिनेमाची टॅगलाइन आहे. प्रवीण तरडे दिग्दर्शित या सिनेमात प्रसाद ओक आणि क्षितिज दाते हे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. यात प्रसाद ओकनं आनंद दिघेंची तर क्षितिज दातेनं एकनाथ शिंदेंची भूमिका साकारली आहे.
#Live 🗓️20-07-2024
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 20, 2024
📍 वरळी, मुंबई
'धर्मवीर २' या चित्रपटाचा ट्रेलर अनावरण सोहळा - लाईव्ह
https://t.co/c3e2rzOJhF
अनेक दिग्गजांच्या उपस्थित ट्रेलर प्रदर्शित : 'धर्मवीर 2' सिनेमात अनेक गोष्टींचा उलगडा होणार असल्याचं ट्रेलरमधून सांगण्यात येत आहे. त्यामुळं आनंद दिघेंच्या मृत्यूचं गूढ, एकनाथ शिंदेंच्या बंडाची गोष्ट अशा अनेक गोष्टींचा उलगडा या ट्रेलरमधून मिळणार का? याची देखील उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली होती. या ट्रेलर प्रदर्शित सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक राजकीय मंडळी तसंच सलमान खानचीही उपस्थिती होती.
अनेक संवादांनी वेधलं लक्ष : दरम्यान, या ट्रेलरमध्ये काही संवादांनी विशेष लक्ष वेधलं. त्यात प्रामुख्यानं एकनाथ शिंदेंच्या बंडाचं कारण, आनंद दिघेंचा मृत्यू कसा झाला? असे अनेक प्रश्न उपस्थित करणारे संवाद यात आहेत. 'कुणाशी तरी आघाडी करुन तुम्ही विकलात तो भगवा रंग' आनंद दिघेंनी म्हणलेला हा संवाद सगळ्यात जास्त लक्ष वेधून घेत आहे. तसंच एकनाथ शिंदे यांची भूमिका साकारणाऱ्या क्षितिज दातेच्या '20 वर्षांपूर्वी याच ठाण्यात एक दाढीवाला बेसावध होता, पण जाताना दुसऱ्या दाढीवाल्याला सावध करुन गेला' या संवादानं लक्ष वेधून घेतलं.
कधी होणार प्रदर्शित : दोन वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे' या सिनेमाचा हा सीक्वल असणार आहे. 'धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे' या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली होती. आता पुन्हा त्याची पुनरावृत्ती होईल, अशी भावना या सिनेमाचे निर्माते मंगेश देसाई यांनी व्यक्त केली. येत्या ऑगस्ट महिन्यात क्रांती दिनाचं औचित्य साधून 'धर्मवीर 2' हा चित्रपट एकाचवेळी मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे, असंही मंगेश देसाई यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान, धर्मवीर 2 या सिनेमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील भूमिका साकारल्याचं म्हटलं जातंय. या सिनेमाच्या पोस्टर लॉन्च दरम्यान, सचिन पिळगावकर यांनी केलेल्या या वक्तव्यामुळंही चर्चा रंगली होती.
चित्रपटामुळे अनेकांचे मुखवटे गळून पडतील : सध्या ट्रेलर लॉन्चबरोबरच चर्चा होत आहे ते देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाची. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना फडणवीस यांनी आपल्याला देखील एक चित्रपट काढायचा असल्याचं म्हटलं. या चित्रपटामुळे अनेकांचे मुखवटे गळून पडतील, असे देखील ते म्हणाले. त्यामुळं सध्या देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाची चर्चा होत आहे. फडणवीस म्हणाले की, "आनंदाची गोष्ट आहे. गुरूपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला एकनाथ शिंदे यांच्यासारखा नेता घडवला अशा दिघे साहेबांच्या जीवनावर आधारित चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला. हिंदुत्वाशी गद्दारी करणाऱ्यांना क्षमा नाही. ही फक्त चित्रपटाची टॅगलाईन नाही तर ती आमच्या सरकारची देखील टॅगलाईन आहे."
हेही वाचा - 'धर्मवीर 2' चित्रपटमुळं बाळासाहेबांचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न?