मुंबई - 'बिग बॉस' विजेता सूरज चव्हाण यानं मोठ्या पडद्यावर पदार्पण केलेला 'राजा राणी' हा चित्रपट 18 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळताना दिसतो. महाराष्ट्रभर रिलीज झालेल्या या चित्रपटाची कथा समजासमोर चुकीचा संदेश देणारी असल्याची भूमिका घेऊन यावर बंदी यावी अशी मागणी काही लोक करत आहेत. मात्र हा सिनेमा तसा नाही, तुम्ही प्रत्यक्ष जाऊन थिएटरमध्ये सिनेमा पाहण्याचं आवाहन बिग बॉस विजेता आणि या चित्रपटाचा कलाकार सूरज चव्हाणनं केलंय. या चित्रपटावर अन्याय होतोय असंही त्यानं बोलून दाखवलं.
'राजा राणी' चित्रपटाचा नायक रोहन पाटील यानं निवेदन करताना सांगितलं की, सूरज चव्हाणसारखा एक सामान्य घरातील मुलगा यशाच्या दिशेनं वाटचाल करतोय. परंतु समाजातील काही लोकांना हे बघवतं नाही, त्यामुळेच 'राजा राणी'वर बंदी करण्याची मागणी केली जात आहे. या चित्रपटात चुकीचं असं काहीच नाही. हा केवळ प्रपोगंडा असल्याचं सांगत या चित्रपटाला सहकार्य करण्याचं आवाहनही त्यानं केलंय. या चित्रपटात सूरज चव्हाणची मोठी भूमिका असल्याचं रोहननं सांगितलं.
'बिग बॉस'मध्ये ट्रॉफी जिंकल्यानंतर सूरज चव्हाणचा रिलीज होणारा हा पहिलाच चित्रपट आहे. त्याला सबंध महाराष्ट्रातून मोठा सपोर्ट मिळाला होता. राज्यभर त्याचे नवीन चाहते बिग बॉसच्या निमित्तानं तयार झालेत. त्यामुळं या 'राजा राणी' चित्रपटाकडून त्याला आणि निर्मात्याला मोठ्या अपेक्षा आहेत. 'राजा राणी' या चित्रपटात रोहन पाटीलसह भारत गणेशपुरे, सुरेश विश्वकर्मा, माधवी जुवेकर, भक्ती चव्हाण, शिवाज दोलताडे यांच्यासह सैराट फेम तानाजी गालगुंडे आणि सूरज चव्हाण यांच्याही भूमिका आहेत.
सूरज चव्हाण आगामी झापुक झुपूक या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार असल्याचं दिग्दर्शक केदार शिंदे यांनी जाहीर केलं होतं. अलीकडेच सूरजनं शिंदे यांची भेट घेतली आणि आगामी चित्रपटाबाबत चर्चाही केली. या चित्रपटाच्या शूटिंगला अद्याप सुरवात झालेली नसली तरी केदार शिंदेंचा सिनेमा असल्यामुळं या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा बाळगल्या जात आहेत.