मुंबई - दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग हे जोडपं दोन महिन्यानंतर एकत्र घराबाहेर पडलं. विशेष म्हणजे यावेळी त्यांच्याबरोबर लाडकी लेक दुआ होती. शुक्रवारी मुंबईतील कालिना येथील खाजगी विमानतळाकडे जात असताना हे तिघे दिसले. सप्टेंबर महिन्यात दोघांच्या घरी चिमुकल्या परीचं आगमन झाल्यानंतर हे जोडपे पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी दिसलं आहे.
रणवीर आणि दीपिका यांचा हा कौटुंबिक क्षण सोशल मीडियावर त्वरीत व्हायरल झाला आहे. एका मुलीचे आई वडील म्हणून वावरत असलेल्या या दोघांच्यावर चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. फोटोमध्ये प्रिंटेड ड्रेस परिधान केलेली दीपिका दिसत असून तिनं आपल्या लेकीला जवळ घेतलं आहे.
![Deepika and Ranveer](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/08-11-2024/22855077_ani1.jpg)
दरम्यान, रणवीरनं आपला लूक गुलाबी हुडीमध्ये कॅज्युअल ठेवला होता, त्याच्या सिग्नेचर ओव्हरसाईज चष्मा परिधान करुन होता. या महिन्याच्या सुरुवातीला या दोघांनी सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये मुलगी झालाचा आनंद व्यक्त केला होता. दिवाळीच्या दिवशी, दीपिका आणि रणवीरनं आपल्या मुलीची जगाला ओळख करून दिली. मुलीचं नाव 'दुआ पदुकोण सिंग' असं असल्याचं एका अर्थपूर्ण संदेशासह त्यांनी उघड केलं होतं. या जोडप्यानं आपल्या मेसेजमध्ये लिहिलं होतं, "दुआ: म्हणजे प्रार्थना. कारण ती आमच्या प्रार्थनेचे उत्तर आहे. आमचे अंतःकरण प्रेम आणि कृतज्ञतेने भरलेले आहे."
![Deepika and Ranveer](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/08-11-2024/22855077_ani.jpg)
दिवाळीत या जोडप्यानं केलेली ही घोषणा त्यांच्या चाहत्यांसाठी निखळ आनंद देणारा क्षण होता. या जोडप्यासाठी नेहमी प्रार्थना करणाऱ्या चाहत्यांसाठी आपली प्रार्थना 'दुआ' झाल्याचा आनंद त्यांच्या प्रतिक्रियातून दिसत होता.
रणवीर सिंग आणि दीपिका यांनी 2018 मध्ये लग्नबंधनात अडकल्यानंतर 8 सप्टेंबर 2024 रोजी त्यांच्या पहिल्या बाळाचं स्वागत केलं. दोघांनी ही बातमी एक सोशल मीडिया पोस्टमधून चाहत्यांना कळवली होती आणि पालकत्वाचा आनंद स्वीकारताना त्यांची कृतज्ञता आणि उत्साह व्यक्त केला.
त्यांच्या कामाच्या आघाडीबद्दल बोलायचं झालं तर ही जोडी रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन' या कॉप ड्रामामध्ये ऑन-स्क्रीन एकत्र दिसत आहे. 1 नोव्हेंबरला रिलीज झालेल्या या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद प्रेक्षकांनी दिला आहे. यामध्ये दीपिका शक्ती शेट्टी उर्फ लेडी सिंघमची भूमिका करत आहे. या चित्रपटात करीना कपूर खान, अर्जुन कपूर, अजय देवगण, टायगर श्रॉफ आणि अक्षय कुमार यांच्यासह एक पॉवरहाऊस कलाकारांची टीम देखील आहे.