मुंबई - 'कंतारा' या चित्रपटामुळे लोकप्रियतेच्या कळसावर पोहोचलेला अभिनेता ऋषभ शेट्टीच्या आगामी चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. आगामी चित्रपटात तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. 'छत्रपती शिवाजी महाराज' असं या चित्रपटाचं नाव आहे. संदीप सिंग या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. निर्मात्यांनी अलीकडंच या चित्रपटाचं एक लक्षवेधी पोस्टर शेअर करून चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख आणि इतर तपशील जाहीर केले आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत 'ऋषभ'चा नवा लूक
निर्मात्यांनी नुकतेच चित्रपटाचं एक पोस्टर रिलीज केलं आहे. यामध्ये ऋषभ शेट्टीचा लूक समोर आला आहे. छत्रपती शिवाजीच्या लूकमध्ये ऋषभ कमालीचा शांत दिसत आहे. हातात तलवार घेऊन ऋषभ आपल्या पारंपारिक रूपातील शिवाजी महाराजांचे उत्तम प्रकारे प्रतिनिधित्व करताना दिसत आहे. पोस्टर शेअर करताना, निर्मात्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलंय, "आमचा सन्मान भारताचा महान योद्धा राजा - प्राइड ऑफ इंडिया: द एपिक गाथा ऑफ छत्रपती शिवाजी महाराज".
चित्रपट कधी प्रदर्शित होणार
निर्मात्यांनी पोस्टरच्या कॅप्शनमध्येच चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर केली आहे. त्यांनी पुढे लिहिलंय की, "हा केवळ एक चित्रपट नाही - हा एका योद्धाच्या सन्मानार्थ एक युद्धगर्जना आहे. ज्या छत्रपतींनी सर्व अडचणींशी लढा दिला, बलाढ्य मुघल साम्राज्याला आव्हान दिलं आणि कधीही विसरता येणार नाही असा वारसा निर्माण केला. छत्रपती शिवाजी महाराजांची अनोळखी कहाणी उलगडत असताना एका वेगळ्या सिनेमॅटिक अनुभवासाठी आणि मॅग्नम ऑपस अॅक्शन ड्रामासाठी सज्ज व्हा. हा चित्रपट 21 जानेवारी 2027 रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे."
सध्या, ऋषभ शेट्टी 'कंतारा चॅप्टर 1' चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट 2022 मध्ये रिलीज झालेल्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'कंतारा'चा प्रीक्वल आहे. 'कंतारा'चा हा दुसरा भाग 2 ऑक्टोबर 2025 रोजी जगभरातील थिएटरमध्ये दाखल होणार आहे. 'कंतारा'ला सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि ऋषभला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.