मुंबई - यंदाच्या दिवळीत 'सिंघम अगे'न आणि 'भूल भुलैया 3' हे दोन बहुचर्चित चित्रपट एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. 'भूल भुलैयाचा 3' च्या ट्रेलरला प्रेक्षकांनी अफाट प्रतिसाद दिला असला तरी अॅडव्हान्स बुकिंगमध्ये रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सिंघम अगेन'ला अधिक प्रतिसाद मिळत आहे. 'सिंघम अगेन'च्या ट्रेलरने प्रेक्षकांची चित्रपटाबाबत असलेली अस्वस्थता वाढवली असून आता 'सिंघम अगेन' हा चित्रपट सीबीएफसीने यूए ( UA )प्रमाणपत्रासह पास केला आहे. याशिवाय सेन्सॉर बोर्डानेही चित्रपटाच्या काही दृश्यांवर कात्री चालवली आहे.
सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनने सिंघम 3 ला UA प्रमाणपत्र बहाल केलं आहे. याबरोबरच चित्रपटात काही बदलही करण्यात आले आहेत. सेन्सॉर बोर्डाने 23 सेकंदांचा मॅच कट सीन बदलण्यास सांगितलं आहे. या सीनमध्ये भगवान राम, माता सीता आणि हनुमान यांना सिंघम, अवनी आणि सिम्बाच्या रुपात दाखवण्यात आलं आहे. यातील दृश्यात सिंघम श्रीराम यांच्या पायाला स्पर्श करतो हे दृश्यही बदलण्यास सांगितलं आहे.
या चित्रपटात आणखी एक 16 सेकंदांचा सीन आहे, ज्यामध्ये रावण माता सीतेला ढकलत आहे आणि खेचत आहे, तर 29 सेकंदाच्या सीनमध्ये हनुमानचा सीन आणि सिंबा यांच्या या दृश्यांवर सेन्सॉरने स्पष्टपणे कात्रीचा वापर केला आहे. तसेच चार ठिकाणी झुबेर नावाच्या पात्राचे संवाद बदलण्यात आले आहेत. याशिवाय 26 मिनिटांचे संवाद आणि दृश्येही सेन्सॉर बोर्डानं बदलण्यास सांगितलं आहे. चित्रपटात पोलिस ठाण्यात शिरच्छेदाचं दृश्य आहे, ते अस्पष्टपणे दाखवले जाणार आहे. या सीनमधील धार्मिक ध्वज आणि शिवकालीन झेंडे हटवण्यात आले आहेत.
इतकंच नाही तर, 'तेरी कहानी का रावण मैं हूं, तेरे चहीते को भेज' असा चित्रपटात एक डायलॉग आहे, या सीनमध्ये झेंड्याचा रंग बदलण्यात आला आहे. चित्रपटात एक डिस्क्लेमरही देण्यात आला आहे. हे चित्रपटाच्या सुरुवातीला जोडलं गेलं आहे. डिस्क्लेमरमध्ये असे लिहिले आहे की, चित्रपटाची कथा जरी प्रभू रामापासून प्रेरित असली तरी ती पूर्णपणे काल्पनिक आहे, चित्रपटातील कोणतेही पात्र देवाशी जोडले जाऊ नये, या कथेत आजच्या लोकांचे आणि समाजाचे तसेच त्यांच्या संस्कृतीचे चित्रण करण्यात आलं आहे. चित्रपटातील या डिस्क्लेमरची वेळ 1 मिनिट 19 सेकंद आहे. चित्रपटाचा रनटाइम 2 तास 24 मिनिटे आणि 12 सेकंद इतका आहे.
अजय देवगण, अक्षय कुमार, करीना कपूर खान, जॅकी श्रॉफ, अर्जुन कपूर, रणवीर सिंह, दीपिका पदुकोण, टायगर श्रॉफ यांचा मल्टीस्टारर चित्रपट 'सिंघम अगेन' 1 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. आणि या चित्रपटात सलमान खानचा कॅमिओ भूमिकेत दिसणार आहे.