मुंबई - Mamata Kulkarni drug case : सिने अभिनेत्री ममता कुलकर्णीला मुंबई उच्च न्यायालयानं दिलासा दिला आहे. तिच्याविरोधात अंमली पदार्थ तस्करी प्रकरणात दाखल झालेला गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी तिनं याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती भारती डांगरे व न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठानं ममता कुलकर्णीची याचिका स्वीकारत असल्याचे जाहीर केलं, त्यामुळे तिला दिलासा मिळाला आहे.
2016 मध्ये ममता कुलकर्णी विरोधात ठाणे पोलिसांनी एनडीपीएसच्या कलमान्वये गुन्हा नोंद केला होता. त्याविरोधात ममतानं उच्च न्यायालयात धाव घेतली होती. 2018 मध्ये तिनं गुन्हा रद्द करण्यासाठी याचिका दाखल केली होती. मात्र त्या याचिकेबरोबर जोडलेली कागदपत्रं गहाळ झाली. याचिकेतील महत्त्वाची कागदपत्रं गहाळ झाल्यानं या प्रकरणाची सुनावणी होऊ शकली नव्हती व परिणामी हा खटला प्रलंबित राहिला होता.
याबाबत यापूर्वी झालेल्या सुनावणी दरम्यान या याचिकेतील गहाळ कागदपत्रे शोधली जात असल्याची माहिती उच्च न्यायालयाच्या निबंधक कार्यालयाकडून न्यायालयाला देण्यात आली होती. याप्रकरणी दोन्ही बाजूंनी सहकार्य करावं आणि सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशानुसार प्रकरण लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी सहाय्य करावं, अशा सूचना न्यायालयाने दिल्या होत्या. मात्र गहाळ झालेली कागदपत्रे शेवटपर्यंत सापडू शकली नाहीत, त्यामुळे उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं अखेर ममता कुलकर्णी यांची याचिका स्वीकारण्याचा निर्णय घेतला.
ठाणे पोलिसांनी 2016 मध्ये केलेल्या कारवाईत आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ तस्करीचे रॅकेट उध्वस्त केलं होतं. त्यामध्ये विकी गोसावी हा प्रमुख आरोपी होता. त्यामुळे त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. विकी गोस्वामी हा ममता कुलकर्णीचा पती आहे. या प्रकरणाच्या सखोल चौकशीत ममता कुलकर्णीचं देखील नाव आलं होतं, त्यामुळे ठाणे पोलिसांनी तिच्या विरोधात देखील गुन्हा दाखल केला होता.
तब्बल दोन हजार कोटी रुपयांच्या अमली पदार्थांच्या तस्करीमध्ये ममता कुलकर्णी विरोधात गुन्हा दाखल झाल्यानं खळबळ उडाली होती. मात्र या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नसून केवळ विकी गोसावीची पत्नी असल्यानं पोलिसांनी आपल्याला या खोट्या गुन्ह्यात गोवल्याचा दावा ममता कुलकर्णी तर्फे करण्यात आला होता. त्यानंतर ममता कुलकर्णीनं हा गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली होती. ममता कुलकर्णीनं बॉलीवूडमध्ये अनेक चित्रपटात यापूर्वी अभिनेत्री म्हणून काम केलं आहे. गेल्या काही वर्षांपासून मात्र ती चित्रपटसृष्टी पासून दूर आहे.