मुंबई - आनंदाचा, उत्साहाचा सण म्हणून दिपावली साजरी केली जाते. सामान्य लोकांपासून ते साजातील सर्व थरातील लोक या सणाचा आनंद आपल्या परीने घेत असतात. मूळचा भारतीय असलेला हा सण आज जगाच्या पाठीवर अनेक देशामध्ये भारतीय वंशाचे आणि इतर मिळून साजरे करत असतात. या सगळ्यामध्ये बॉलिवूड सेलेब्रिटीही आघाडीवर आहेत. बिग बी अमिताभ बच्चन, रणबीर कपूर, आलिया भट्ट, हृतिक रोशन, जान्हवी कपूरपासून ते सिनेक्षेत्रातील तंत्रज्ञापर्यंत यंदाची दिवाळी धूमधडाक्यात साजरी झाली. शाहरुख खानचा 59 वा वाढदिवस ऐन दिवाळीत आल्यामुळं त्याच्यासाठी हा दुग्धशर्करा योग होता.
अभिनेता हृतिक रोशनने त्याची मैत्रीण सबा आझाद आणि कुटुंबासह दिवाळी साजरी करतानाचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. यामध्ये हृतिक पारंपारिक आणि अनौपचारिक पोशाखात दिसत असून तो घरातील इतर सदस्यांबरोबर फोटोसाठी पोज देताना दिसत आहे.
अभिनेत्री प्रियांका चोप्रानं तिच्या चाहत्यांसाठी तिच्या दिवाळी आणि हॅलोविनच्या सेलिब्रेशनची झलक दाखवली आहे. तिनं पती निक जोनास आणि मुलगी मालती मेरी चोप्रा जोनाससोबत दिवाळी आणि हॅलोविन साजरे केले. तिनं इंस्टाग्रामवर अनेक फोटो टाकले आणि कॅप्शनमध्ये सेलिब्रेशनला 'परफेक्ट दिवालोवीन' म्हटलं आहे.
बॉलिवूडचे स्टार कपल रणबीर कपूर आणि आलिया भट्ट शुक्रवारी संध्याकाळी वांद्रे येथील त्यांच्या घराबाहेर त्यांच्या लाडक्या राहाबरोबर दिवाळी साजरी करताना दिसले. दीपोत्सवाचा आनंद घेताना तिघांनी मॅचिंग पोशाख परिधान केला होता.
अभिनेत्री जान्हवी कपूरनं तिच्या चाहत्यांसाठी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आणि तिच्या उत्सवाची झलक शेअर केली. जान्हवीनं तिचे वडील बोनी कपूर, बहीण खुशी कपूर, अफवा असलेला प्रियकर शिखर पहारिया आणि त्यांचे पाळीव कुत्रे असलेले फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
ज्येष्ठ अभिनेता अनुपम खेर यांनी त्यांच्या कार्यालयात भाऊ राजू खेर याच्याबरोबर पूजा करून दिवाळी साजरी केली. शुक्रवारी, अनुपमनं त्याच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आणि लिहिले, "ऑफिस मे दिवाळी की पूजा सम्पर्ण हुई! जय लक्ष्मी माता!" व्हिडिओमध्ये तो राजूसोबत धार्मिक विधी करताना दिसत आहे.
बॉलिवूड स्टार करीना कपूर खान पती सैफ अली खान आणि मुले तैमूर आणि जेह यांच्यासह मालदीवमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे. शुक्रवारी करीनानं सैफबरोबरचा सुर्यास्ताच्यावेळचा रोमँटिक फोटो शेअर केला. दुसऱ्या एका फोटोमध्ये सैफ आणि करीना एकमेकांना किस करताना दिसत आहेत. "माय लव्ह #2024 सह दिवाळी सूर्यास्त," असं तिनं पोस्टला कॅप्शन दिलंय.