नवी दिल्ली - छठ गाण्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या बिहारच्या लोकगायिका 'पद्मभूषण' शारदा सिन्हा गेल्या काही दिवसांपासून आजारी पडल्या होत्या. त्यांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांना दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्यानं त्यांच्यावर उपचार सुरू होते. अलीकडेच त्यांच्या पतीचे निधन झालं होतं. आज ५ नोव्हेंबरला त्यांचं निधन झालं.
शारदा सिन्हा यांची प्रकृती बिघडली
२६ ऑक्टोबरला सकाळी शारदा सिन्हा यांची अचानक तब्येत बिघडली. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. गेल्या काही दिवसांपासून त्यांना खाण्यापिण्यात खूप अडचणी येत होत्या, त्यासाठी दिल्लीच्या एम्समध्ये त्यांच्यावर उपचारही सुरू होते, २६ ऑक्टोबरला सकाळी अचानक त्यांची तब्येत आणखी बिघडली. आईला आयसीयूमध्ये हलवण्यात आलं असल्याचं, शारदा सिन्हा यांचा मुलगा अंशुमन याने ईटीव्ही भारतला सांगितलं होतं.
"आईवर डॉ. राजा प्रामाणिक यांच्या स्पेशल केअर युनिटमध्ये उपचार सुरू आहेत. प्रकृतीत थोडी सुधारणा झाली होती, ती आयसीयूमधून बाहेर आली होती पण नंतर अचानक तिची प्रकृती खालावली. त्यानंतर तिला पुन्हा आयसीयूमध्ये हलवण्यात आलं आहे, " असं अंशुमन यानी सांगितलं होतं. आज अखेर त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
शारदा सिन्हा यांची अनेक भाषांमध्ये गाणी
मैथिली, मगही आणि भोजपुरी भाषेतील प्रसिद्ध गायकांमध्ये जर एखाद्याची गणना केली तर शारदा सिन्हा यांचे नाव अग्रभागी येतं. छठ सणाच्या वेळी बिहारमध्येच नाही तर बिहारबाहेरही एखाद्या गायकाची गाणी वाजवली जात असतील तर ती गाणी शारदा सिन्हा यांचीच असतात. शारदा सिन्हा यांनी लोकभाषेशिवाय हिंदी चित्रपटांमध्येही गाणी गायली आहेत.
शारदा सिन्हा यांचा जन्म 1 ऑक्टोबर 1952 रोजी बिहारच्या सुपौल जिल्ह्यातील हुलास गावात झाला. 1970 मध्ये, त्यांचा विवाह बेगुसराय येथील बिहार शिक्षण सेवा अधिकारी ब्रज किशोर सिंह यांच्याशी झाला. त्यांचा अलीकडेच 22 सप्टेंबर 2024 रोजी मृत्यू झाला.
पद्मश्री आणि पद्मभूषणने सन्मानित
भारत सरकारनं कला क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल 1991 मध्ये शारदा सिन्हा यांना प्रतिष्ठित पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं होतं. यानंतर, 2018 मध्ये, त्यांना पद्मभूषण पुरस्कारानं देखील सन्मानित करण्यात आलं आहे.