मुंबई : 'बिग बॉस मराठी सीझन 5' चा ग्रँड फिनाले रविवारी (6 ऑक्टोबर) पार पडला. 'बिग बॉस'च्या पाचव्या सीझनमध्ये सूरज चव्हाण विजयी स्पर्धक ठरला. 'बिग बॉस मराठी सीझन 5' हा कार्यक्रम गेले 70 दिवस सुरू होता. या 70 दिवसात बारामतीचा सोशल मीडिया स्टार सूरज आपल्या अनोख्या शैलीमुळं महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचला. 'बिग बॉस'च्या घरात टॉप 6 फायनलिस्टमध्ये अभिजीत सावंत, सूरज चव्हाण, अंकिता वालावलकर, निक्की तांबोळी, धनंजय पोवार आणि जान्हवी किल्लेकर पोहोचले होते. मात्र, सूरजनं या चांगल्या-चांगल्या स्पर्धकांना टक्कर देत 'बिग बॉस'च्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. बुक्कीत टेंगुळ, झापुक झुपुक, गुलिगत धोका हे सुरजचे डायलॉल फेमस आहेत. 'बिग बॉस'ची ट्रॉफी जिंकल्यानंतर सूरज चव्हाणनं 'ईटीव्ही भारत'ला आपल्या प्रवासाबद्दल 'Exclusive' मुलाखत दिली.
यशानं हुरळून जाणार नाही : "मी अतिशय गरीब परिस्थितीतून पुढे आलोय. आता मला पैसा, प्रसिद्धी मिळत आहे. पण, मी कधीच यशानं हुरळून जाणार नाही," असं सूरज म्हणाला. "मी जमिनीवरच असेन, माझे पाय कधीच हवेत असणार नाही. मी शेवटपर्यंत असाच साधा आणि सरळ राहणार आहे. मी गावी जाऊन घर बांधणार आहे आणि घराला 'बिग बॉस'चं नाव देणार आहे," असं सूरजनं सांगितलं.
कसा होता प्रवास? : तुझं शिक्षण कमी झालं आहे. बिग बॉसच्या घरात तुला खेळ समजत नव्हता, तरीसुद्धा तू विजेता ठरलास? असा प्रश्न सूरजला विचारला असता तो म्हणाला की, "मला सुरुवातीला गेम समजत नव्हता. मला भीती वाटत होती. मला गेम कळला नाही, पण 'बिग बॉस'च्या घरातली माणसं कळत होती. घरात मला सर्वांनीच प्रेम दिलं. यामध्ये वर्षा ताई, पॅडी दादा आणि अंकिताताई या सर्वांनी मला सांभाळून घेतलं. महाराष्ट्रातल्या जनतेनं मला भरभरून प्रेम दिलं, वोटिंग केलं त्यांच्यामुळंच मी या ट्राफीवर नाव कोरलं."
विश्वास बसला नव्हता : "जेव्हा 'बिग बॉस'कडून मला बिग बॉसमध्ये येण्यासाठी फोन आला होता, तेव्हा मला विश्वास बसत नव्हता. मी फोन कट केला. त्यानंतर दुसऱ्यांदा फोन आला. मग मी घरी माझ्या बहिणीसोबत आणि मित्रांसोबत याबाबत चर्चा केली. त्यानंतर मी ठरवलं की, आपण 'बिग बॉस'मध्ये गेलं पाहिजे. त्यानंतर मी इथे आलो, इथे आल्याचा मला फायदा झाला. मी ट्रॉफी जिंकलोय, याचा मला आनंद होतोय. ट्रॉफी जिंकेन, असा विश्वास मला सुरुवातीपासूनच होता. कारण, महाराष्ट्रातील तमाम जनतेनं माझ्यावर प्रेम केलं. त्यामुळं महाराष्ट्रातील जनतेचे मी आभार मानतो," असं म्हणत महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानायला सूरज चव्हाण विसरला नाही.
गाव-खेड्यातील मुला-मुलींनी पुढं आलं पाहिजे : ग्रामीण भागातील, गाव- खेड्यातील मुला-मुलींमध्ये टॅलेंट असतं, गुणवत्ता असते. पण मनात भीती आणि न्यूनगंड असल्यामुळं ते पुढं येत नाहीत, हे सत्य आहे. अशांसाठी सूरज एक आदर्श आहे. "मी माझ्या महाराष्ट्रातील भावा-बहिणींना सांगू इच्छितो की, तुम्ही मनात भीती बाळगू नका किंवा मनात न्यूनगंड बाळगू नका. तुमच्यात जे टॅलेंट आहे ते पुढं आणा. नक्कीच तुम्ही यशस्वी व्हाल," असं सूरज चव्हाणनं महाराष्ट्रातील तमाम मुला-मुलींना आवाहन केलं.
हेही वाचा