मुंबई - आयुष्यातील 55 वर्षे विधिमंडळाचे सदस्य म्हणून कायम जनसेवा करणारे शेतकरी कामगार पक्षाचे दिवंगत नेते भाई गणपतराव देशमुख यांच्या कार्यावर आधारित 'कर्मयोगी आबा साहेब' हा चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकांचं वारं वाहू लागलंय. अशा वेळी अनेक प्रस्थापित नेतेमंडळी युती आणि आघाडीकडे निवडणुकीचं तिकीट मिळवण्यासाठी जीवाचं रान करताहेत. तिकीट मिळालं नाही तर ऐनवेळी कोलांटी उडी मारुन दुसऱ्या पक्षात जाण्याची भूमिकाही अनेकांची आहे. या पार्श्वभूमीवर आयुष्यभर शेतकरी कामगार पक्षाचा झेंडा घेऊन शेवटच्या श्वासापर्यंत पक्ष सेवा करणारे गणपतराव देशमुख हे सर्वच राजकारण्यांसाठी आदर्श ठरतात. त्यांच्या जीवनावर आधारित बनलेला चित्रपट कसा असेल याची प्रतीक्षा आता सुरू झाली आहे. 28 ऑक्टोबर रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
राज्यातील शेतकरी व कामगारांच्या प्रश्नासाठी झगडणारा, तत्वनिष्ठ राजकारणी, सामान्य लोकांच्या प्रश्नांची जाण असणारा, सहकार चळवळीतील नेता तसेच राज्यातील प्रश्नांचा अभ्यासपूर्वक विधानसभेत आवाज उठवणारा नेता म्हणून त्यांची ओळख अवघ्या महाराष्ट्राला होती. 11 वेळा आमदार आणि दोन वेळा कॅबिनेट मंत्री म्हणून सांगोला मतदार संघ आणि राज्याची सेवा केलेल्या भाई गणपतराव देशमुख यांचा जीवनपट मोठ्या पडद्यावर उलगडणार असल्यामुळे या चित्रपटाकडून प्रेक्षकांच्या मोठ्या अपेक्षा आहेत.
कर्मयोगी आबा साहेब या चित्रपटाचं दिग्दर्शन अल्ताफ दादासाहेब शेख यांनी केलं आहे. शेख यांनीच या चित्रपटाची कथा आणि पटकथाही लिहिली आहे. यामध्ये गणपतराव देशमुखांची भूमिका अनिकेत विश्वासराव करत आहे. हार्दिक जोशी, देविका दफ्तरदार, पृथ्वी प्रताप, विजय पाटकर, प्रदीप वेलणकर, सुरेश विश्वकर्मा, अरबाज शेख, तानाजी गालगुंडे, अहमद देशमुख, वृंदाबाळ, निकीता सुखदेव, अलि शेख आणि अल्ताफ दादासाहेब शेख यांनी यामध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.
'कर्मयोगी आबा साहे या चित्रपटाची काही गाणी यापूर्वी रिलीज करण्यात आली आहेत. यापैकी 'दमदार आमदार ' हे गाणं कुणाल गांजावाला यांनी गायलं आहे. 'सुंबरान मांडलं हो' हे एक लोकगीतही या चित्रपटात आहे. धनगरी नृत्याचा समावेश असलेलं हे गाणं मनिष राजगिरे यांनी गायलंय. या चित्रपटातील गाण्यांना अवधूत गुप्ते यांनी संगीत दिलं असल्यामुळे गाण्याकडूनही प्रेक्षकांच्या मोठ्या अपेक्षा आहेत.