मुंबई Arun Govil News : भाजपानं पश्चिम उत्तर प्रदेशातील मेरठ लोकसभा मतदारसंघासाठी 'रामायण' या टीव्ही मालिकेत भगवान रामाची भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविल यांना उमेदवारी दिली आहे. मेरठमध्ये 'बाहेरचा नेता नको' म्हणून त्यांच्यावर आधीच टीका झाली होती. असं असतानाच ते मतदान संपताच मेरठ सोडून मुंबईत परतल्यानं, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. दरम्यान, मुंबईत का परतावं लागलं? हे अभिनेता गोविल यांनी आता स्पष्ट केलंय.
एक्सवर पोस्ट करत सांगितलं कारण : शुक्रवारी (26 एप्रिल) मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर, त्याच्या दुसऱ्यादिवशीच अरुण गोविल हे मुंबईला परतले. त्यानंतर या मुद्द्यावरुन विरोधकांनी गोविल यांच्यावर निशाणा साधत टीका करायला सुरुवात केली. विरोधकांच्या टीकेनंतर आता पक्षाच्या आदेशानुसार मी मेरठहून मुंबईत परतल्याचं गोविल यांनी स्पष्ट केलंय. यासंदर्भात अरुण गोविल एक्सवर पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं की , "मेरठच्या माझ्या आदरणीय मतदार, भगिनींनो, बंधू आणि कार्यकर्त्यांनो...नमस्कार. होळीच्या दिवशी म्हणजेच 24 मार्चला भारतीय जनता पक्षानं माझ्या नावाची घोषणा केली. त्यानंतर त्यांच्या सूचनेनुसार मी 26 मार्चला तुमच्याकडं पोहोचलो. 1 महिना तुमच्या सोबत राहून तुमच्या पाठिंब्यानं प्रचार केला. तुमच्या प्रेम, समर्थन आणि आदराबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे. आता पक्षाच्या सूचनेनुसार मी माझी जबाबदारी पार पाडण्यासाठी मुंबईत आलो आहे."
...त्यानंतर मी पुन्हा येईल : पुढं ते म्हणाले की, "भारतीय जनता पक्ष मला निवडणूक प्रचारासाठी इतर भागातही पाठवण्याचा विचार आहे. निवडणुकीचे प्रचारकार्य पूर्ण झाल्यानंतर मी पुन्हा एकदा मेरठला येईल. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मी मेरठलाची आणखी प्रगती करण्यासाठी प्रयत्न करेन. या निवडणुकीत तुम्ही दिलेल्या पाठिंब्याबद्दल आणि प्रोत्साहनाबद्दल मी पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो", असं अरुण गोविल आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
सनी देओल हरविल्याचे लागले होते फलक- अनेक सेलिब्रिटी हे आपल्या मतदारसंघात फिरकत नाहीत, असा मतदारांचा आरोप असतो. अभिनेता सनी देओल हा पंजाबमधील गुरुदासपूर लोकसभा मतदारसंघाचं खासदार म्हणून प्रतिनिधीत्व करतो. मात्र, मतदारसंघात जात नसल्यानं भाजपाचे खासदार सनी देओल हरविल्याचे पोस्टर ठिकठिकाणी लावले होते. त्यानंतर सनी देओलनं यंदा लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याचं जाहीर केलं.
हेही वाचा -
- निवडून आल्यानंतर काय काम करायचं ते ठरवेन, भाजपा उमेदवार अरुण गोविल यांचं मोघम उत्तर - Lok Sabha Elections 2024
- 'वीर मुरारबाजी'मध्ये झळकणार राम-सीतेची जोडी, अरुण गोविल आणि दीपिका चिखलीया रुपेरी पडद्यावर - RAMAYANA FAME RAM SITA
- रामायण फेम कलाकार अरुण गोविल, सुनील लाहिरी आणि दीपिका चिखलियाचे अयोध्येत आगमन