मुंबई Lata Mangeshkar Award : संगीत रंगभूमीवर इतिहास रचणारे ज्येष्ठ गायक कलाकार मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानच्या वतीनं दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांना सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात अनन्यसाधारण महत्त्व आहे. गेल्या 34 वर्षात संगीत, नाट्य, कला, वैद्यकीय, पत्रकारिता आदी क्षेत्रातल्या 212 दिग्गजांना पुरस्कारानं गौरवण्यात आलंय. सन 2022 पासून 'गानसम्राज्ञी' लता मंगेशकर यांच्या स्मरणार्थ लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार प्रदान करण्याचा निर्णय प्रतिष्ठानच्या विश्वस्त मंडळाने घेतला.
काय म्हणाले अमिताभ : पुरस्कार मिळाल्यावर बिग बी अमिताभ म्हणाले की, "हा पुरस्कार मिळाल्याबद्दल मी भाग्यवान समजतो. आज हा पुरस्कार मिळणं माझे भाग्य आहे. मी स्वतःला अशा पुरस्कारासाठी कधीच पात्र समजलं नाही. परंतु हृदयनाथजींनी खूप प्रयत्न केले जेणेकरुन मी इथं येऊ शकलो. गेल्या वर्षीही त्यांनी मला या कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं होतं."
अमिताभ बच्चन यांची कारकीर्द : बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन वयाच्या 81 व्या वर्षीही पडद्यावर खूप सक्रिय आहेत. त्यांची कारकीर्द खूपच प्रेरणादायी आणि चढ-उतारांनी भरलेली आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की त्याचा पहिला चित्रपट 'सात हिंदुस्तानी' बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. मात्र, महानायकानं हिंमत हारली नाही. तरीही त्यांनी मेहनत सुरुच ठेवली. 'जंजीर' चित्रपटाच्या यशानंतर त्यांनी मागं वळून पाहिलंच नाही. अमिताभ यांनी 'दीवार' (1975), 'शोले' (1975), 'त्रिशूल' (1978), 'डॉन' (1978) आणि 'कालिया' (1981) यासारख्या उत्कृष्ट चित्रपटांमध्ये काम केलं. येत्या काही दिवसांत अमिताभ हे बहुप्रतिक्षित 'कल्की 2898 एडी' चित्रपटामध्ये अश्वत्थामाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
पुरस्काराचे आतापर्यंत मानकरी : दरवर्षी मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या स्मृतिदिनी 'लता दीनानाथ मंगेशकर' पुरस्काराचं वितरण केलं जातं. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिल्या वर्षी 'लता दीनानाथ मंगेशकर' पुरस्काराचे मानकरी ठरले. तर दुसऱ्या वर्षी म्हणजे 2023 साली 'स्वराशा' आशा भोसले या पुरस्काराच्या मानकरी ठरल्या. यावर्षी सर्वानुमते या प्रतिष्ठे्च्या पुरस्कारासाठी अमिताभ बच्चन यांच्या नावाची निवड करण्यात आली.
एकूण 11 कलाकारांचा सन्मान : अमिताभ बच्चन यांच्यासह संगीत दिग्दर्शक ए आर रहमान (प्रदीर्घ संगीत सेवा) यांना मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. तसंच 'गालिब' या नाटकाला उत्कृष्ट नाट्यनिर्मितीसाठी मोहन वाघ पुरस्कार, 'दीपस्तंभ फाउंडेशन मनोबल' ला समाजसेवेसाठी आशा भोसले पुरस्कृत आनंदमयी पुरस्कार, प्रदीर्घ साहित्य सेवेसाठी मंजिरी मराठे यांना 'वाग्विलासिनी पुरस्कार', अशोक सराफ (प्रदीर्घ नाट्य, चित्रपट सेवा), पद्मिनी कोल्हापुरे (प्रदीर्घ चित्रपट सेवा), रुपकुमार राठोड (प्रदीर्घ संगीत सेवा), भाऊ तोरसेकर (प्रदीर्घ पत्रकारिता), अतुल परचुरे (प्रदीर्घ नाट्य सेवा) आणि रणदीप हुडा (उत्कृष्ट चित्रपट निर्मिती विशेष पुरस्कार) यांना यंदाचा दीनानाथ मंगेशकर पुरस्कार प्रदान करण्यात आला.
हेही वाचा :