मुंबई - यशराज फिल्म्सच्या गुप्तहेर विश्वातील 'अल्फा' या आगामी चित्रपटाची रिलीज डेट समोर आली आहे. आलिया भट्ट आणि शर्वरी वाघ यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'अल्फा' या चित्रपटासाठी प्रेक्षकांना अद्यापही काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. अलीकडेच आलिया भट्ट आणि शर्वरी वाघ यांनी काश्मीरमध्ये या चित्रपटाचे 10 दिवसांचे शूटिंग शेड्यूल पूर्ण केलं होतं. चित्रपटाच्या पुढील शेड्यूलपूर्वी, आज 4 ऑक्टोबर रोजी निर्मात्यांनी 'अल्फा'च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. यशराज बॅनरने या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर रिलीज केले आहे. यावर या चित्रपटाची रिलीज डेट झळकल्याचं दिसत आहे.
'अल्फा' चित्रपट कधी प्रदर्शित होणार?
आलिया भट्ट आणि शर्वरी वाघ यांचा 'अल्फा' हा चित्रपट २५ डिसेंबर २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. यापूर्वी आलिया भट्ट, रणबीर कपूर आणि विकी कौशल स्टारर चित्रपट 'लव्ह अँड वॉर' हा चित्रपट या तारखेला प्रदर्शित होणार होता. पण अलीकडेच त्याचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी 'लव्ह अँड वॉर'च्या रिलीजच्या तारखेत बदल झाल्याची माहिती दिली होती. आता 'लव्ह अँड वॉर' 20 मार्च 2026 रोजी रिलीज होणार आहे. 'अल्फा' चित्रपटाबद्दल सांगायचं तर शिव रवैल यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलंआहे. यशराज बॅनरचे मालक आदित्य चोप्रा या चित्रपटाचे निर्माते आहेत.
हिंदी चित्रपटांच्या इतिहासात महिला गुप्तहेरांवर आधारित असलेला फिमेल स्पाय युनिव्हर्सचा हा पहिलाच चित्रपट ठरणार आहे. यामध्ये आलिया आणि शर्वरी मास अॅक्शन करताना दिसणार आहेत.
आलिया भट्ट 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटात अखेरची दिसली होती. आता आलिया भट्टचा 'जिगरा' हा चित्रपट ११ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. तर शर्वरी वाघने चालू वर्षात 'मुंज्या' या सुपर हॉरर चित्रपटात परफॉर्मन्स केला होता.