मुंबई - अभिनेत्री आलिया भट्ट तिच्या इटरनल सनशाइन प्रॉडक्शन निर्मित 'पोचर' या मालिकेची निर्माती म्हणून कार्यरत झाली आहे. या मालिकेबद्दल उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिलेली असताना आलियाने प्राण्यांच्या शिकारीबाबत जनजागृती करणारा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओतून तिने प्राण्यांची शिकार किंवा हत्या हा खून असल्याचे अधोरेखित केले आहे.
रिची मेहता लिखित, निर्मित आणि दिग्दर्शित 'पोचर' या मालिकेतून निमिषा सजयन, रोशन मॅथ्यू आणि दिव्येंदू भट्टाचार्य यांचा कसदार अभिनय पाहायला मिळणार आहे. ही मालिका सत्य घटनांवर आधारित आहे आणि भारतातील सर्वात मोठ्या हस्तिदंती शिकारीची गोष्ट यातून उलगडून दाखवण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून याची निर्मिती कर्यात आली आहे.
इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करताना आलिया भट्टने कॅप्शनमध्ये लिहिले की, "हा जनजागृती व्हिडिओ शूट करण्यासाठी मी जंगलात एका दिवसापेक्षाही कमी वेळ घालवला, परंतु तरीही मला थंडी भरुन आली. मर्डर इज मर्डर. तुम्हाला जास्त काळ ताटकळत ठेवू इच्छित नाही. रिची मेहता आणि आमचे स्टार कलाकार निमिषा सजयन, रोशन मॅथ्यू आणि दिव्येंदू भट्टाचार्य यांच्या नजरेतून संपूर्ण कथा उलगडत जाईल."
व्हिडिओमध्ये, आलिया भट्टला लोडेड रायफल, बुलेटचे आवरण आणि निर्जीव शरीराच्या रूपरेषा पाहून तिला धक्का बसल्याचे दिसत आहे. तिने आपला राग व्यक्त करताना सांगितले की, "आज सकाळी 9 वाजता अशोकच्या हत्येची नोंद झाली. या महिन्यातली तिसरी घटना. त्याचा मृतदेह निर्जीव, विद्रुप अवस्थेत होता. अशोक अवघ्या 10 वर्षांचा होता. त्याने त्याच्या मारेकऱ्यांना कधी पाहिले नाही. ते कदाचित पळून जातील असे त्यांना वाटले असेल पण तसे होणार नाही. फक्त अशोक आपल्यापैकी नव्हता म्हणून हा गुन्हा काही कमी महत्वाचा ठरत नाही. कारण खून हा खून आहे."
'पोचर' या मालिकेची ही कथा भारतीय वन सेवेतील अधिकारी, एनजीओ कर्मचारी, पोलीस हवालदार आणि तपासादरम्यान न्याय मिळवण्यासाठी आपला जीव धोक्यात घालणाऱ्या व्यक्तींच्या भोवती फिरते. सुटेबल पिक्चर्स, पुअर मॅन्स प्रॉडक्शन्स आणि क्यूसी एंटरटेनमेंट यांच्या सहकार्याने आलिया तिच्या इटरनल सनशाइन प्रॉडक्शनद्वारे या मालिकेसाठी कार्यकारी निर्माता म्हणून काम केले आहे.
हेही वाचा -