मुंबई - Akshay Kumar and Shankar Mahadevan : हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता अक्षय कुमारनं बुधवारी 14 फेब्रुवारी रोजी अबुधाबी येथील बोचासनवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्था (BAPS) हिंदू मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याला हजेरी लावली. अबुधाबीमध्ये बांधलेल्या या पहिल्या हिंदू मंदिराचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं आहे. दरम्यान अक्षयनं त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर या मंदिराचा एक फोटो शेअर केला आहे. अबुधाबीतील हिंदू मंदिराच्या उद्घाटनावर आनंद व्यक्त करताना अक्षयनं कॅप्शनमध्ये लिहिलं, ''अबू धाबीतील बोचासनवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्था (BAPS) हिंदू मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहून मी धन्य झालो आहे, हा ऐतिहासिक क्षण आहे.''
संगीत दिग्दर्शक शंकर महादेवन कार्यक्रमात हजर : याशिवाय या कार्यक्रमात संगीत दिग्दर्शक, गायक शंकर महादेवन यांनी देखील हजेरी लावली होती. त्यांनी यावर म्हटलं, ''हा भारत आणि जगभरातील भारतीयांसाठी आनंदाचा क्षण आहे. हा सर्वांच्या जीवनातील ऐतिहासिक क्षण आहे.'' याशिवाय त्यांनी अबुधाबी पोहचल्यानंतर एक व्हिडिओ शूट केला, ज्यात त्यांनी स्वामीनारायण मंदिराच्या उद्घाटनाबद्दल सांगितलं. याआधी शंकर महादेवन हे राम मंदिर उद्घाटन सोहळ्यामध्ये देखील सामील झाले होते. स्वामीनारायण मंदिराचा उद्घाटन सोहळा भव्यतेनं पार पडला आहे.
अक्षय कुमारचं वर्कफ्रंट : अक्षय कुमारच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर त्याच्या आगामी 'बडे मियाँ छोटे मियाँ' आणि 'सरफिरा' या दोन चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. 'बडे मियाँ छोटे मियाँ' हा 10 एप्रिलला ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात अक्षयबरोबर टायगर श्रॉफ दिसणार आहे. दुसरीकडे 'सरफिरा' हा चित्रपट साऊथ सुपरस्टार सूर्या स्टारर चित्रपट 'सोरारई पोटरू'चा हिंदी रीमेक आहे, ज्याचे शीर्षक आणि रिलीज तारीख अलीकडेच जाहीर करण्यात आली आहे. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे. 'सरफिरा' चित्रपट 12 जुलै रोजी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होत आहे. याशिवाय पुढं तो 'वेलकम टू द जंगल' या चित्रपटामध्येही दिसणार आहे. अक्षयचा हा चित्रपट मल्टीस्टारर आहे.
हेही वाचा :