मुंबई - Gharat Ganapati : सिनेमा हिट झाला की त्या चित्रपटातील नायक नायिकेची जोडीही हिट होते. प्रेक्षक त्यांना पुन्हा पुन्हा नवीन चित्रपटातून बघण्याची इच्छा दर्शवत असतात. हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत रुपेरी पडद्यावर अनेक नायक-नायिका जोड्यांनी प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळवली. त्या जोड्या जणू त्यांच्या हृदयावर अधिराज्य करीत होत्या. त्यातीलच एक खास जोडी म्हणजे अजिंक्य देव आणि अश्विनी भावे. लवकरच ही जोडी ‘घरत गणपती’ या मराठी चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. नुकताच चित्रपटाचा टिझर प्रदर्शित करण्यात आला.
चित्रपटाचा टीझर पाहून प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाची उत्सुकता वाढली आहे आणि हा चित्रपट त्यांच्यासाठी एक खास आनंदाची पर्वणी ठरणार आहे. ‘घरत गणपती’ हा चित्रपट पॅनोरमा स्टुडिओज आणि नॅविअन्स स्टुडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने निर्मित झाला असून या चित्रपटाचे दिग्दर्शन नवज्योत नरेंद्र बांदिवडेकर यांनी केले आहे. निर्मिती कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, नम्रता बांदिवडेकर, नवज्योत नरेंद्र बांदिवडेकर, आणि गौरी कालेलकर-चौधरी यांनी केली आहे.
या चित्रपटात अजिंक्य देव 'शरद घरत' या कुटुंबवत्सल पती आणि प्रेमळ वडिलांची भूमिका साकारणार आहेत, तर अश्विनी भावे 'अहिल्या घरत' या कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहणाऱ्या आईची भूमिका साकारणार आहेत. याआधी ‘शाब्बास सूनबाई’, ‘मायेची सावली’, 'चल गंमत करू’, ‘सरकारनामा’ या चित्रपटांमधून त्यांच्या केमिस्ट्रीने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं होतं. आता २५ वर्षांनी ‘घरत गणपती’च्या निमित्ताने पुन्हा एकत्र येताना त्यांनी प्रेक्षकांना आनंद देण्याचे वचन दिले आहे.
या चित्रपटाची कथा श्री गणरायाच्या आगमनाच्या निमित्ताने घरत कुटुंबातील अनुबंधांची हलकी-फुलकी गोष्ट आहे. अजिंक्य आणि अश्विनी यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री ही या चित्रपटाचा सर्वात मोठा आकर्षण बिंदू आहे. चित्रपटाचा विषय आणि या दोघांचे अभिनय प्रेक्षकांना नक्कीच भावेल असा विश्वास दोघांनीही व्यक्त केला आहे. आधीच्या चित्रपटातील या जोडीची ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप भावली असल्याने ही जोडी पुन्हा एकत्र असणं हा ‘घरत गणपती’ चित्रपटाचा सर्वात मोठा ‘प्लस पॉइंट’ आहे असे निर्मात्यांचे म्हणणे आहे.
‘घरत गणपती’ येत्या २६ जुलैला महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा -
आमिर खानचा मुलगा जुनैदच्या 'महाराज' चित्रपट रिलीजवर कोर्टानं घातली बंदी, जाणून घ्या कारण? - Maharaj