मुंबई - ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांनी एकत्रित फोटोसाठी हसतमुख पोज दिल्यामुळं त्यांच्यावर आग पाखडणाऱ्यांची तोंडं बंद झाली आहेत. गेल्या काही काळापासून दोघांच्या नात्यात दुरावा झाल्याच्या अफवा पसरत होत्या. अभिषेक आणि ऐश्वर्यानं याला कधीही उत्तर देणं महत्त्वाचं समजलं नव्हतं. परंतु सोशल मीडियावर त्यांना सतत ट्रोल केलं जात होतं. या पार्श्वभूमीवर ऐश्वर्या आणि अभिषेक एका हाय प्रोफाईल पार्टीमध्ये दिसले. यातील त्यांचा फोटो व्हायरल झाला आहे. या पार्टीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसह अनेक सेलेब्रिटी हजर होते.
चित्रपट निर्माता अनु रंजन यांनी त्यांचे या पार्टीतले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अभिनेत्री आयशा झुल्कानेही या पार्टीतील आणखी काही फोटो शेअर केले आहेत. ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना एकत्र पाहून त्यांच्या चाहत्यांना आनंद झाला आहे. सार्वजनिक ठिकाणी ते दोघं ऐश्वर्याची आई वृंदा राय यांच्यासह फोटोत आनंदी दिसत आहेत.
अभिषेक बच्चन सध्या त्याच्या नुकत्याच रिलीज झालेल्या 'आय वॉन्ट टू टॉक' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. याचं दिग्दर्शन शुजित सरकार यांनी केलं आहे. चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान दिलेल्या एका मुलाखतीत अभिषेकनं आई जया बच्चन, पत्नी ऐश्वर्या, मुलगी आराध्या आणि कुटुंबाविषयी खास गोष्टी सांगितल्या होत्या. पत्नी ऐश्वर्या रायबाबत अभिषेकनं म्हटलं होतं की, "ती खूप चांगली आई आहे आणि मुलगी आराध्याचे खूप छान संगोपन करत आहे. मी खूप नशीबवान आहे. मी घराबाहेर राहून चित्रपट करतो आणि ऐश्वर्या घरी राहून मुलीची काळजी घेते. याबद्दल खरोखर तिचे आभार मानले पाहिजेत. परंतु मला नाही वाटत की मुलं याकडे अशा प्रकारे पाहात असतील. ते तुम्हाला त्रयस्थ व्यक्ती म्हणून पाहात नाहीत."
अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्यात बिनसल्याची चर्चा जोरात असतानाही याबद्दल दोघांपैकी कोणीही उघडपणे बोललेलं नाही. अशातच अभिषेकचं नाव त्याची 'दसवी' चित्रपटाची सहकलाकार निम्रत कौर हिच्याबरोबर जोडलं गेल्यानं गावगप्पांना अधिक पेव फुटलं.
एप्रिल 2007 मध्ये अभिषेक आणि ऐश्वर्या राय यांनी शाही पद्धतीने लग्न केलं पार पडलं होतं. त्यांच्या सुखी संसारात आराध्याचा जन्म 2011 मध्ये झाला होता. अलीकडेच ऐश्वर्या रायनं तिची मुलगी आराध्याचा 13 वा वाढदिवस साजरा केला. याप्रसंगी झालेल्या पार्टीत बच्चन कुटुंबातील एकही सदस्य न दिसल्यामुळेही अनेक चर्चा घडल्या होत्या.