मुंबई - भारताच्या लोकसंख्येत तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात असल्याने भविष्यात या देशाची भिस्त तरुणाईच्या हातात आहे. गेली अनेक दशके राजकारण्यांमुळे भ्रष्टाचार वाढत गेला ही गंभीर बाब आहे. भ्रष्टाचारमुक्त देश बनवायचा असेल तर देशाची सूत्रे तरुण पिढीकडे सोपवण्यात यावी हा विचार जोर धरतोय. संपूर्ण देशाला पोखरणाऱ्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर भाष्य करणारा एक चित्रपट येऊ घातलाय ज्याचे नाव आहे, 'निर्धार'. आजच्या काळातील भ्रष्टाचार, जो केवळ समाजालाच नव्हे तर संपूर्ण देशालाच पोखरत आहे, यावर हा चित्रपट भाष्य करतो.
असाध्य वाटणाऱ्या उद्दिष्टांसाठी ठाम निर्धार केला तर कठीण गोष्टीही शक्य होऊ शकतात. असाच प्रबळ निर्धार दाखवणारा आगामी मराठी सामाजिक चित्रपट 'निर्धार' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतेच 'निर्धार' चित्रपटाच्या गाण्याच्या ध्वनीमुद्रणाद्वारे चित्रपटाचा शुभारंभ मुबईतील जुहू येथील आजिवासन स्टुडिओमध्ये करण्यात आला. भ्रष्टाचाराचा पूर्णतः नाश करण्याचा 'निर्धार' केलेल्या तरुणांची कहाणी या चित्रपटात मांडली आहे.
दिलीप भोपळे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून लेखन दीनानाथ वालावलकर यांचे आहे. जयलक्ष्मी क्रिएशन निर्मिती संस्थेअंतर्गत निर्मात्या पद्मजा वालावलकर यांनी 'निर्धार' या चित्रपटाची निर्मिती केली आहे. मुहुर्तावेळी निर्माते, दिग्दर्शक, कलाकार, संगीतकार, तंत्रज्ञ आणि मराठी चित्रपटसृष्टीतील विविध मान्यवर उपस्थित होते. गीतकार दीनानाथ वालावलकर यांनी लिहिलेले ‘दे ना शक्ती मातरम, वंदे मातरम…’ हे गाणे ओंकार सोनवणे, लयश्री वेणूगोपाल, मीरा सूर्या, आयुश तावडे, उत्तेज जाधव, प्रज्ञा जामसंडेकर यांनी गायले असून, राज पादारे यांनी ते संगीतबद्ध केले आहे.
डॉ. गिरीश ओक, सौरभ गोगटे, पल्लवी पटवर्धन, प्रज्ञा केळकर, मिलिंद ऊके, उमेश बोळके, अभिनव कुरणे, जान्हवी सावंत, ऋतुजा कनोजिया, अथर्व पाटील, श्रेयस मोहिते, दिनानाथ वालावलकर, युवराज झुगर, केतकी पाटील, आनंद पाटील, सुरेंद्र केतकर, विद्या डांगे, एन. डी. चौगुले या कलाकारांनी 'निर्धार' मध्ये भूमिका साकारल्या आहेत. सिनेमॅटोग्राफी अतुल सुपारे यांनी केली असून, कला दिग्दर्शन विकी बिडकर यांनी पाहिले आहे. वेशभूषेचे काम प्रशांत पारकर यांनी केले असून, रंगभूषा अतुल शिधये यांनी केली आहे. सहाय्यक दिग्दर्शक नंदू आचरेकर, प्रमुख सहाय्यक दिग्दर्शक संतोष जाधव असून महेंद्र पाटील यांनी क्रिएटिव्ह प्रोड्यूसर म्हणून काम पाहिले आहे. संग्राम भालकर यांनी नृत्य दिग्दर्शन केले आहे तर कैलास भालेराव व अजय खाडे यांनी निर्मिती व्यवस्थापक म्हणून काम सांभाळले आहे.