मुंबई - Mukkam Post Bombilwadi : मराठी प्रेक्षकांना नाटकाचं खूप वेड आहे. पूर्वी अनेक मराठी नाटकांचे हजारो प्रयोग झाले आहेत. परंतु टेलिव्हिजन मालिका आणि चित्रपट यांची संख्या वाढली असली, तरी मराठी प्रेक्षकांच्या हृदयात नाटकांसाठी एक हळवा कोपरा आहे आहे, त्यामुळेच कदाचित अनेक मराठी नाटकांचे प्रयोग होत असतात. मराठी नाटकांविषयी प्रेक्षकांची ही ओढ पाहून काही निर्माते नाटकांवर आधारित चित्रपट बनवत आहेत. काही महिन्यांपूर्वीच 'अलीबाबा आणि चाळिशीतले चोर' हा सिनेमा येऊन गेला, जो याच नावाच्या नाटकावर आधारित होता. आता अजून एक रंगभूमीवर गाजलेलं मराठी नाटक चित्रपटाच्या रूपात येत आहे. 'मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी' या नाटकानं प्रेक्षकांचे अफाट मनोरंजन केलं आहे. या नाटकात जितेंद्र जोशी साकारत असलेल्या पात्राच्या तोंडी असलेल्या 'आव, आव' या हेल काढत म्हटलेल्या संवादांनी नाट्यरसिकांची हसून हसून मुरकुंडी उडवली होती. या नाटकावर आधारित चित्रपट आता चित्रपटरसिकांना 'आव आव' हाळी घालत चित्रपटगृहापर्यंत आणणार आहे. लेखक-दिग्दर्शक परेश मोकाशी आणि लेखिका-निर्माती मधुगंधा कुलकर्णी या चित्रपटावर काम करत आहेत.
'मुक्काम पोस्ट बोंबीलवाडी' नाटकावर आधारित चित्रपट : परेश मोकाशी आणि मधुगंधा कुलकर्णी हे दाम्पत्य सतत नवनवीन प्रयोग करीत प्रेक्षकांसाठी मनोरंजनात्मक कलाकृती घेऊन येत असतात. 'हरीश्चंद्राची फॅक्टरी', 'एलिझाबेथ एकादशी', 'वाळवी' या तीन मराठी चित्रपटांना मिळालेल्या राष्ट्रीय पुरस्कारांच्या हॅटट्रिकनंतर आता पुन्हा एकदा ते रुपेरी पडद्यावर धमाका करण्यासाठी येत आहेत. त्यांच्या 'नाच गं घुमा’नं भारतात आणि परदेशातही प्रेक्षकांकडून वाहवा मिळविली. आता त्यांच्या आगामी चित्रपटाचं नाव 'मु.पो. बोंबिलवाडी – 1942 एका बॉम्बची बोंब’ आहे. या चित्रपटाच्या मोशन पोस्टरमध्ये दाखवलेल्या दृश्यांवरून, हा चित्रपट ब्रिटिश साम्राज्यातील स्वातंत्र्यपूर्व काळातील एका बॉम्बस्फोटाच्या कथानकावर आधारित असल्याचा अंदाज बांधला जाऊ शकतो.
मधुगंधा कुलकर्णीनं केलं चित्रपटाबद्दल भाष्य : मधुगंधा कुलकर्णी चित्रपटाबद्दल बोलताना म्हणाल्या, "जेव्हा मी ‘मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी’ हे नाटक पहिल्यांदा पाहिलं, तेव्हा मला प्रचंड हसू आलं. त्यावेळीच मला जाणवलं की, या नाटकावर चित्रपट बनवावा. नाटकाचं रुपांतर करताना, काही गोष्टी चित्रपटात आणणे सोयीस्कर होते आणि त्यामुळे विनोद अजूनही खुलेल असे वाटते. परेशनं नाटक तसंच न ठेवता, त्यात सिनेमाच्या माध्यमात योग्य ते बदल केले आहेत. त्यामुळे चित्रपटात हास्याची मात्रा अनेक पटींनी वाढली आहे." 'मु.पो. बोंबिलवाडी – 1942 एका बॉम्बची बोंब’ या चित्रपटाची निर्मिती मधुगंधा कुलकर्णी, विवेक फिल्म्स आणि मयसभा करमणूक मंडळी यांची असून दिग्दर्शन परेश मोकाशी यांचे आहे. हा चित्रपट 25 डिसेंबर 2024ला प्रदर्शित होणार आहे. मूळ नाटक 'मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी' मधून गीतांजली कुलकर्णी, जितेंद्र जोशी, वैभव मांगले या कसलेल्या कलाकारांनी आपली छाप सोडली होती. चित्रपटात कुणाच्या प्रमुख भूमिका आहेत, हे मात्र परेश-मधुगंधाने तूर्त सस्पेन्स ठेवलं आहे.