हैदराबाद What is One Nation One Gold Rate Policy : सोने खरेदी हा भारतीयांसाठी विशेषत: महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा विषय असतो. सणाबरोबरच विविध आनंदाच्या प्रसंगी सोने परिधान केले जाते. त्यामुळे भारतात सोने खरेदीचे प्रमाण लक्षणीय आहे. त्यामुळे देशातील सोने खरेदीवर आमुलाग्र बदल करणाऱ्या नव्या धोरणाबाबत जाणून घेऊ.
कर, वाहतूक खर्च, स्थानिक मागणी आणि सरकारी धोरणांसह अनेक कारणांमुळं सोन्याची किंमत राज्यानुसार बदलते. कमी कर आणि मजबूत बाजारातील स्पर्धा असलेल्या राज्यांमध्ये उच्च कर आणि मर्यादित बाजारातील स्पर्धा असलेल्या राज्यांपेक्षा सोन्याच्या किमती कमी आहेत. सोन्याच्या विक्रीत पारदर्शकता आणण्यासाठी राज्यांमध्ये 'वन नेशन, वन गोल्ड रेट' (ONOR) धोरण लागू करण्यासाठी ज्वेलरी उद्योग एकत्र आलाय. जेम्स अँड ज्वेलरी कौन्सिल (GJC) द्वारे समर्थित ONOR उपक्रमाची सप्टेंबरमध्ये बैठक होणार आहे. त्यानंतर धोरणाची अधिकृत घोषणा केली जाईल.
'वन नेशन, वन गोल्ड रेट' धोरण काय? : भारताच्या 'वन नेशन, वन गोल्ड रेट' धोरणाचे मुख्य उद्दिष्ट देशभरातील सोन्याचे दर प्रमाणित करणं, अधिक पारदर्शकता आणि निष्पक्षतेसाठी प्रादेशिक अडथळे दूर करणे आहे. ONOR धोरणाचे उद्दिष्ट देशभरात सोन्याचा एकसमान दर प्रस्थापित करणे आहे. त्यामुळे स्थानिक कर आणि बाजार परिस्थितीतील फरकांमुळं निर्माण होणारी प्रादेशिक असमानता दूर होईल. सध्या, विविध कर संरचना आणि स्थानिक मागणी-पुरवठ्यातील चढउतारांमुळं भारतातील सोन्याच्या किमती विविध राज्यांमध्ये लक्षणीयरीत्या चढ-उतार होऊ शकतात. यामुळं अनेकदा खरेदीदार आणि विक्रेते दोघांसाठी गोंधळ आणि गैरसोय होते.
वन नेशन, वन गोल्ड रेट धोरणाचे फायदे :
- 'वन नेशन, वन गोल्ड रेट' धोरणामुळं ग्राहकांच्या आत्मविश्वासात वाढ होऊ शकते.
- जेव्हा सोन्याच्या किमती प्रमाणित केल्या जातात, तेव्हा प्रादेशिक किमतीतील फरकांमुळं अधिक पैसे देण्याची चिंता न करता ग्राहक खरेदीचे निर्णय घेऊ शकतात.
- ग्राहकांना एक विश्वासार्ह मालमत्ता म्हणून सोन्यात गुंतवणूक करण्यास प्रोत्साहन मिळेल.
- देशभरात धोरणाची अंमलबजावणी झाल्यानं भारताच्या सुवर्ण उद्योगालाही चालना मिळण्याची शक्यता आहे.
- पारदर्शक आणि वाजवी किंमत प्रणालीमुळं, सोन्याच्या बाजारात देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांचा सहभाग वाढू शकतो. यामुळं सोन्याची मागणी वाढू शकते.
- मागणी वाढल्यानं खाण कामगार, रिफायनर्स आणि किरकोळ विक्रेत्यांना फायदा होईल.
- भारतातील सुवर्ण उद्योगाच्या एकूण वाढीस चालना देऊ शकते.
सोन्याच्या किमती राज्यांमध्ये वेगवेगळ्या का असतात? : भारत हा जगातील सोने खरेदीचा सर्वात मोठा ग्राहक आहे. परंतु देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये सोन्याच्या किमती बदलतात. महाराष्ट्र, केरळ, राजस्थान किंवा इतर कोणत्याही राज्यात सोन्याचा भाव पाहिला तर सर्वत्र किंमती वेगवेगळ्या असताल. प्रत्येक शहरातील स्थानिक बाजारपेठेतील परिस्थिती हा याचा सर्वात मोठा घटक आहे. सोन्याची मागणी आणि पुरवठा तसंच इतर स्थानिक आर्थिक घटकदेखील सोन्याचे दर ठरवण्यात भूमिका बजावतात. याव्यतिरिक्त, प्रत्येक शहरात स्वतःचे सोनार आणि ज्वेलर्स यांचे दर वेगवेगळे असतात. ते त्यांच्या कारागिरीसाठी वेगवेगळे शुल्क आकारू शकतात.
- ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट : भारत हा सोन्याच्या मोठ्या आयातदारांपैकी एक आहे. सोन्याचा वाहतूक खर्च जास्त असून वाहतूक खर्चामध्ये इंधन, वाहनं, सुरक्षा इत्यादीचा समावेश होतो. तसंच तुम्ही सोनं घेत असलेल्या राज्य किंवा शहरानुसार वाहतुकीचा खर्च बदलू शकतो.
- सोन्याचे प्रकार : सोने 24 कॅरेट, 22 कॅरेट, 18 कॅरेट आणि 14 कॅरेटचे असू शकते. कॅरेट जितके जास्त असेल तितके सोने शुद्ध असेल आणि त्याचे मूल्यही जास्त असेल.
सोन्याचे दर कसे ठरतात?
- स्थानिक ज्वेलरी असोसिएशन त्यांच्या संबंधित शहरातील सोन्याच्या किमती ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. सोन्याची शुद्धता, स्थानिक मागणी आणि बाजारातील प्रचलित परिस्थिती यासारख्या बाबी लक्षात घेऊन या संघटना अनेकदा किंमत नियामक म्हणून काम करतात. उदाहरणार्थ, अखिल भारतीय ज्वेलर्स अँड गोल्डस्मिथ फेडरेशन (AIJGF) संपूर्ण भारतात सोन्याच्या किमती नियंत्रित करण्यात मोठी भूमिका बजावते.
- किरकोळ विक्रेत्यांचे मार्जिन : सोने विकणाऱ्या किरकोळ विक्रेत्यांचे नफ्याचे मार्जिन वेगळे असते. त्याचा सोने विक्रीच्या किमतीवर परिणाम होऊ शकतो. ज्या शहरांमध्ये किरकोळ दागिने विक्रीचे प्रमाण जास्त आहे, तिथं स्पर्धेमुळं सोन्याचे भाव खाली येऊ शकतात. जयपूर आणि अहमदाबादसारखी शहरं दागिन्यांच्या बाजारपेठांसाठी ओळखली जातात. तिथं खरेदीदारांसाठी अधिक पर्यायांमुळं सोन्याच्या किमती कमी असतात.
- सोन्याची गुणवत्ता : सोन्याच्या किमतींवर परिणाम करणारा आणखी एक घटक म्हणजे त्याची गुणवत्ता. खालच्या दर्जाच्या सोन्यापेक्षा उच्च दर्जाचे सोने अधिक महाग असते.
- सोन्याची खरेदी किंमत : भारतात सोन्यावर 10 टक्के आयात शुल्क आणि 3 टक्के कर आहे. म्हणूनच वेगवेगळ्या देशांमध्ये सोन्याची किंमत बदलते. कारण प्रत्येक देश स्वतःचे शुल्क आणि कर आकारात असतात.
- बाजार परिस्थिती : बाजार परिस्थितीदेखील सोन्याच्या किमतीवर परिणाम करू शकते. सोन्याची मागणी जास्त राहिल्यास सोन्याची किंमत वाढेल. याउलट सोन्याची मागणी कमी झाल्यास सोन्याची किंमत कमी होते.
- सरकारी शुल्क : भारत सरकार सोन्यावर आयात शुल्क लादून सोन्याच्या दरावरदेखील परिणाम करते. देशाच्या राजकीय आणि आर्थिक परिस्थितीनुसार सोन्यावरील आयात शुल्क बदलू शकते. जेव्हा आयात शुल्क जास्त असते. तेव्हा सोन्याची किंमतही वाढते.
केरळमध्ये सोने स्वस्त का आहे : सध्या केरळमध्ये सोन्याचा भाव सर्वात कमी आहे. तसंच दिल्ली आणि मुंबईच्या तुलनेत कर्नाटकात सोन्याचा भाव कमी आहे. दक्षिण भारतातील शहरांमध्ये सोन्याचे भाव उत्तर आणि पश्चिम राज्यातील शहरांपेक्षा खूपच कमी आहेत. केरळमध्ये सोनं खरेदी हा केवळ ट्रेंड नसून त्यामागे एक सामाजिक जडणघडणही आहे. केरळच्या ग्रामीण भागात सोन्यावरील सरासरी दरडोई मासिक खर्च 208.55 रुपये आणि शहरी भागात 189.95 रुपये आहे. केरळमधील सोन्याचे दर प्रामुख्यानं ऑल केरळ गोल्ड अँड सिल्व्हर मर्चंट्स असोसिएशनद्वारे निर्धारित केले जातात. हे अनेक घटकांच्या आधारे सोन्याच्या दैनंदिन किमती ठरवते.
- सोन्याची किंमत कशी ठरवली जाते? : दागिन्यांची अंतिम किंमत = (22 कॅरेट, 18 कॅरेट किंवा 14 कॅरेट) सोन्याची किंमत x ग्रॅममध्ये वजन + मेकिंग चार्जेस + 3% GST (दागिन्यांची किंमत + मेकिंग चार्जेस). मेकिंग चार्ज दोन प्रकारे मोजला जाऊ शकतो. सोन्याच्या किमतीची टक्केवारी किंवा सोन्याच्या प्रति ग्रॅम फ्लॅट मेकिंग चार्ज म्हणून मोजला जाऊ शकतो. सोन्याच्या किंमती विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या सोन्याच्या दागिन्यांच्या प्रकारानुसार बदलतात. कारण प्रत्येक दागिन्यांना कटिंग आणि फिनिशिंगची वेगळी शैली आवश्यक असते. डिझाइनमध्ये किती बारीकसारीक तपशील आवश्यक आहेत. ते मानवनिर्मित किंवा मशीन मेड यावरदेखील अवलंबून असते. यंत्रानं बनवलेल्या दागिन्यांची किंमत सामान्यतः मानवनिर्मित दागिन्यांपेक्षा कमी असते.
हेही वाचा -