जगित्याल Inspiring Journey of a Rural Youth : कोरोना महामारीच्या काळात लॉकडाऊनमध्ये आलेल्या अडचणींची सर्वांनाच जाणीव आहे. या काळात लोकांच्या जीवनात अनेक मोठे चढउतार आले. पण लोकांनी आपली हिंमत गमावली नाही. तेलंगाणातील असाच एक तरुण म्हणजे संजय, ज्यानं सर्व अडथळे पार करुन स्वत:साठी मोठं पद मिळवलं. संजय हा जगित्याल जिल्ह्यातील तुंगूरचा रहिवासी आहे. विशेष म्हणजे त्यानं सर्व आव्हानांचा सामना करुन अवघ्या दोन वर्षांत सहा नोकऱ्या मिळवल्या. आज तो सर्वसामान्यांमध्ये आशेचा किरण म्हणून उदयास आलाय. असं म्हणतात की जर धैर्य मजबूत असेल आणि उद्देश उंच असतील तर सर्वात कठीण ध्येय देखील माणसाला साध्य करता येतं. एका छोट्याशा गावात राहणाऱ्या बेथपू लक्ष्मी-मल्लय्या यांचा मुलगा संजयच्या संघर्षाची कहाणी सांगते की, तुमच्या मनात काहीतरी करण्याची जिद्द असेल, तर संघर्षावर मात करुन तुम्ही स्वतःसाठी एक नवीन जग निर्माण करु शकता.
संजयच्या संघर्षाची कहाणी : अनिश्चिततेतून संजयचा प्रवास सुरू झाला. सुरुवातीच्या काळात त्याला कोणतीही स्पष्ट दिशा नव्हती किंवा त्यानं आपल्या जीवनासाठी कोणतंही ध्येय ठेवलं नव्हतं. मात्र, आयुष्यात काहीतरी चांगलं करण्याचा विचार त्यानं केला. या उद्देशानं त्यानं शैक्षणिक उपक्रमांच्या चक्रव्यूहातून पुढं जाऊन आपलं भविष्य घडवण्यास सुरुवात केली. याच दरम्यान, कोरोनाचं संकट आलं आणि त्याला घरी परतावं लागलं. यातही संजयनं पराभव स्वीकारला नाही. आपला वेळ वाया घालवण्याऐवजी मित्रांच्या मदतीनं त्यानं आपली संपूर्ण मेहनत खडतर स्पर्धा परीक्षांच्या तयारीवर केंद्रित केली.
संजय ठरला तरुणांसाठी प्रेरणास्रोत : तरुण संजयसाठी कोरोनाचा काळ कठीण परीक्षेपेक्षा कमी नव्हता. या काळात त्यानं खूप मेहनत घेतली. त्याच्या मेहनतीचं फळ त्याला 2022 मध्ये मिळालं. जेव्हा त्यानं रेल्वे ग्रुप डी परीक्षा उत्तीर्ण केली आणि त्याला रेल्वेमध्ये पहिली नोकरी मिळाली. मात्र यानं तो संतुष्ट झाला नाही, कारण त्यानं जणू संपूर्ण आकाश जिंकण्याची आकांक्षा बाळगली होती. त्यामुळं त्यानं पहिल्या यशावर अवलंबून न राहता आणखी संधींचा पाठपुरावा सुरू ठेवला. इथंही त्याच्या मेहनतीचं फळ मिळालं. त्यानं 2023 मध्ये तेलंगणा राज्य लोकसेवा आयोग (TPSSC) द्वारे आयोजित कॉन्स्टेबल (अबकारी), नगर नियोजन इमारत अधिकारी गट-4 AEE (सिव्हिल) आणि AE यासह विविध विभागांमध्ये पदं मिळविली. संजयची यशोगाथा ग्रामीण तरुणांमधील प्रतिभेची ओळख करुन देते. त्याचा मित्र, किरणकुमार, इतरांना प्रेरणा देण्यासाठी संजयची यशोगाथा सांगतो. तसंच दृढनिश्चयी तरुण इच्छा असल्यास जग जिंकू शकतो, असंही तो म्हणतो.
स्वप्न पाहणं कधीही थांबवू नका : सध्या संजय निजामाबाद इथं एक्साईज कॉन्स्टेबल पदासाठी प्रशिक्षण घेत आहे. आजही त्यानं आपल्या आकांक्षांना कमी होऊ दिलं नाही. नागरी सेवांसाठी स्पर्धेसह पुढील प्रयत्न सुरू ठेवण्याची मनिषा त्यानं व्यक्त केली आहे. संजयची यशोगाथा जीवनात काहीतरी साध्य करु इच्छिणाऱ्या करोडो तरुणांसाठी प्रेरणास्थान आहे.
हेही वाचा :