आग्रा Wife WhatsApp Status : उत्तर प्रदेशातील आग्रा येथील बाह पोलीस ठाण्याच्या हद्दीत पती-पत्नीमधील वादाचं एक विचित्र प्रकरण समोर आलंय. पतीसोबत झालेल्या वादानंतर आई-वडिलांच्या घरी राहणाऱ्या पत्नीचं व्हॉट्सॲप स्टेटस पाहून पती घाबरुन गेला. पत्नीनं चक्क व्हॉट्सॲपवर पतीच्या हत्येसाठी सुपारी दिल्याचं स्टेटस पोस्ट केलं. ज्यात लिहिलं की, 'जो माझ्या पतीला मारेल, मी त्याला 50 हजार रुपयांचं बक्षीस देईन." या महिलेच्या पतीनं पत्नीचे व्हॉट्सॲप स्टेटस पाहिल्यानंतर बाह पोलीस ठाण्यात धाव घेत पत्नी आणि तिच्या मित्रांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय.
काय म्हणाले पोलीस : बाहचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्याम सिंह यांनी याप्रकरणी सांगितलं की, "पतीच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा तपास सुरु आहे. पतीनं तक्रार केली की, त्याचं लग्न 9 जुलै 2022 रोजी मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यातील एका गावातील मुलीशी झालं होतं. लग्नानंतर दररोज पत्नी वाद घालत असे. तसंच 5 महिन्यांच्या वादानंतर डिसेंबर 2022 पासून पत्नी तिच्या माहेरी गेली. नंतर ती परत आलेली नाही."
पत्नीनं केला भरपाईचा दावा दाखल : पत्नीनं त्याच्याविरुद्ध भिंडमध्ये देखभालीचा खटला दाखल केल्याचा आरोप पतीनं केलाय. पतीनं सांगितलं की, खटल्याची सुनावणी 21 डिसेंबर 2023 रोजी होती. त्यादिवशी तारखेसाठी जात असताना पत्नी व सासरच्यांनी पुन्हा कोर्टात आल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती. आता पत्नीनं तिच्या व्हॉट्सॲपवर एक स्टेटस टाकलं की, "पतीला मारणाऱ्याला 50 हजार रुपयांचं बक्षीस देऊ." पत्नीनं स्टेटसवर लिहिलं की, "माझ्या इच्छेविरुद्ध लग्न झालं. अशा स्थितीत पतीला मारणाऱ्याला मी बक्षीस देईन." पत्नीचे शेजारच्या घरात राहणाऱ्या भाडेकरुसोबत संबंध आहेत. त्यामुळं लग्नापासूनच वाद होत होते. पत्नीमुळं त्या तरुणानं त्याला मोबाईलवर जीवे मारण्याची धमकीही दिल्याचा आरोप पतीनं आपल्या तक्रारीत केलाय.
हेही वाचा :