हैदराबाद Ramoji Rao news: तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी माध्यम सम्राट, पद्मविभूषण रामोजी राव यांच्या निधनानंतर निवास्थानी जाऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. काल (११ जून) मुख्यमंत्री यांनी तुम्माला नागेश्वर राव आणि खासदार चमला किरण रेड्डी यांच्यासह रामोजी फिल्म सिटी येथील रामोजी राव यांच्या निवास्थानी गेले होते. त्यांनी रामोजी रावांच्या छायाचित्राला पुष्प अर्पण करत त्यांचं स्मरण केले.
कुटुंबियांशी संवाद: ईनाडूचे एमडी सीएच किरण, एमडी शैलजा किरण, रामोजी फिल्म सिटीच्या एमडी विजयेश्वरी आणि इतर कुटुंबातील सदस्यांसोबत मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. यावेळी रामोजी राव यांचे स्मरण करत मुख्यमंत्री म्हणाले की, रामोजी रावांच्या जाण्यानं झालेली पोकळी कोणीही भरून काढू शकत नाही. पत्रकारिता, उद्योग आणि चित्रपटसृष्टीत आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यात त्यांची भूमिका महत्वाची आहे. संपूर्ण देशाला त्यांच्यावर अभिमान आहे. ईश्वरानं त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख झेलण्याचे सामर्थ्य प्रदान करावे," अशी भावना मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी यावेळी व्यक्त केली.
मुख्यमंत्री रेड्डी यांनी एक्स मीडियातील पोस्टमध्ये म्हटलं होतं की, "तेलुगू पत्रकारितेमध्ये विश्वासार्हता आणि तेलुगू औद्योगिक क्षेत्राला महत्त्व देण्याचं श्रेय रामोजी राव यांना जाते. तेलुगू माध्यम आणि मीडिया क्षेत्रातील रामोजी रावांची पोकळी कधीही भरून निघणार नाही. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. कुटुंबातील सदस्यांप्रती माझ्या मनापासून संवेदना."
विविध विषयावर संवाद: रामोजी राव आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांचे स्नेहाचे संबंध होते. मुख्यमंत्री झाल्यानंतर रेड्डी यांनी रामोजी राव यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी तेलंगणाचा विकास आणि इतर धोरणांबाबत चर्चा केली होती. विविध विषयाला अनुसरुन त्यांनी अनेकदा रामोजी रावांशी संवाद साधला होता.
रामोजी फिल्म सिटी मार्फत अनेकांना रोजगार: रामोजी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष रामोजी राव यांचं ८ जून रोजी वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झालं. उच्च रक्तदाब आणि श्वासोच्छवासाचा त्रास होऊ लागल्यानं त्यांना ५ जून रोजी नानकरामगुडा येथील स्टार हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारादम्यान त्यांचं निधन झालं. चित्रपट जगतात जगातील सर्वात मोठा थीम पार्क आणि फिल्म स्टुडिओची त्यांनी स्थापना केली. रामोजी फिल्म सिटीतून त्यांनी अनेकांना रोजगारसुद्धा उपलब्ध करुन दिला.
हेही वाचा