नवी दिल्ली Kolkata Doctor Rape Murder Case : कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेज तसंच रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टर बलात्कार तसंच हत्या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयानं स्वतःहून दखल घेतलीय. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश (CJI) धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील तीन न्यायमूर्तींंचं खंडपीठ मंगळवारी, 20 ऑगस्ट रोजी या प्रकरणाची सुनावणी करणार आहे. या खंडपीठात न्यायमूर्ती जेबी परडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांचाही समावेश आहे.
देशात संतापाची लाट : कोलकाता येथील रुग्णालयात महिला डॉक्टरसोबत घडलेल्या घृणास्पद घटनेमुळं संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. वैद्यकीय विद्यार्थी आणि निवासी डॉक्टरांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला आहे. या प्रकरणाची न्यायालयीन देखरेखीखाली चौकशी करण्याची मागणी केली आहे. या घटनेच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशननं (आयएमए) शनिवारी 24 तासांचा देशव्यापी संप पुकारला होता.
- सॉल्ट लेक स्टेडियमजवळ निदर्शनं : आरजी कर मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयातील महिला निवासी डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येविरोधात मोठ्या संख्येनं लोकांनी कोलकाता येथील सॉल्ट लेक स्टेडियमजवळ निदर्शनं केली. यावेळी त्यांनी पीडितेला न्याय देण्याची मागणी केली.
सीबीआयकडून प्रकणाचा तपास सुरू : कोलकाता महिला डॉक्टरच्या हत्ये प्रकरणाबाबत देशभरात संताप वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयानं हे पाऊल उचललं आहे. कोलकाता पोलीस आणि वैद्यकीय महाविद्यालयाचे तत्कालीन प्राचार्य संदीप घोष यांच्यावर प्रकरण दडपण्याचा आरोप आहे. या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) करत आहे. तपासासंदर्भात सीबीआयनं आतापर्यंत 20 जणांची चौकशी केली आहे.
9 ऑगस्ट रोजी घडला प्रकार : प्रशिक्षणार्थी डॉक्टर 9 ऑगस्ट रोजी सरकारी आरजी कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या सेमिनार हॉलमध्ये मृतावस्थेत आढळून आली होती. घटनेच्या दिवशी पीडित महिला नाईट शिफ्ट ड्युटीवर होती. रात्री विश्रांतीसाठी ती हॉलमध्ये गेली होती. तिथं तिच्यावर अमानुष हल्ला करून त्याची हत्या करण्यात आली. या प्रकरणी सध्या रुग्णालयात तैनात असलेल्या एका स्वयंसेवकाला अटक करण्यात आली आहे.
माजी प्राचार्याच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह : या प्रकरणात आणखी अनेक लोकांचा सहभाग असल्याचा संशय आहे. रुग्णालयाचे माजी प्राचार्य संदीप घोष यांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सीबीआयनं रविवारी सलग तिसऱ्या दिवशी घोष यांना चौकशीसाठी बोलावलं आहे. याआधी शनिवारी संदीप घोष यांची 13 तासांहून अधिक काळ चौकशी करण्यात आली. सीबीआयच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, शनिवारी संदीप घोष यांना डॉक्टरांच्या मृत्यूची बातमी मिळाल्यानंतर त्यांनी काय केलं? कोणाशी संपर्क साधला, असा प्रश्न विचारण्यात आला. तसंच त्यांनी मृतांच्या पालकांना सुमारे तीन तास वाट पहायला लावली, असा सवालही केला. या घटनेनंतर सेमिनार हॉलजवळील खोल्यांचं नूतनीकरण करण्याचं आदेश कोणी दिले? अशी प्रश्नांची सरबत्ती त्यांच्यावर करण्यात आली.
- घटनेमागं षडयंत्र असल्याचा संशय : या गुन्ह्यामागं काही षडयंत्र होतं का, पूर्वनियोजनानुसार ही घटना घडली का? प्राचार्य काय करत होते?, त्यांचाही या घटनेत सहभाग आहे का, याचा शोध घेण्याचा सीबीआय प्रयत्न करत आहे.
'हे' वाचलंत का :
- केंद्रानं घेतली डॉक्टर संघटना संपाची दखल; कायदा आणि सुव्यवस्थेचा अहवाल प्रत्येक दोन तासाला द्या - गृह मंत्रालय - Kolkata Doctor Rape Murder Case
- पुण्यात 20 हजार डॉक्टर संपावर, आरोग्यसेवा कोलमडली - Doctors strike in Pune
- कोलकाता घटनेच्या निषेधार्थ डॉक्टरांचा संप, जिल्ह्यातील आरोग्य सेवा एक दिवस बंद - Doctors strike in Sambhajinagar