नवी दिल्ली SC Grants Bail To Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (आप) प्रमुख अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळालाय. सर्वोच्च न्यायालयानं शुक्रवारी केजरीवाल यांना 1 जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केलाय. यामुळं अरविंद केजरीवाल यांच्यासह 'आप'ला मोठा दिलासा मिळालाय.
कार्यकर्त्यांकडून आनंदोत्सव साजरा : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तिहार तुरुंगातून बाहेर आले. ऐन निवडणुकांच्या तोंडावर केजरीवाल यांना जामीन मिळाल्यानं राजकीय वातावरण तापलंय. 'आप' नेते आणि कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मिळाल्यानंतर पक्षानं शुक्रवारचे सर्व कार्यक्रम रद्द करून ठिकठिकाणी आनंदोत्सव साजरा केला.
51 दिवस केजरीवाल होते तुरुंगात : दिल्लीतील कथित दारू घोटाळ्यात ५१ दिवस तिहार तुरुंगात बंद असलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची शुक्रवारी संध्याकाळी तुरुंगातून सुटका करण्यात आली. दुपारी सर्वोच्च न्यायालयाने आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 1 जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे. सायंकाळी जामिनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल आपल्या मुलीसह तिहार तुरुंगात पोहोचल्या. तेथून ते एकत्र बाहेर आले.
हुकूमशाहीपासून वाचवायचे आहे : तुरुंगातून बाहेर आल्यानंतर केजरीवाल सीएम हाऊसमध्ये पोहोचले. काही वेळ कार्यकर्त्यांना संबोधित केले. यामध्ये ते म्हणाले की, देशाला हुकूमशाहीपासून वाचवायचे आहे. मी म्हणालो होतो की, मी लवकर येईन, मी इथेच आहे. सर्वप्रथम मला हनुमानजींच्या चरणी नमन करायचे आहे, हनुमानजींच्या आशीर्वादाने मी तुम्हा सर्वांमध्ये आहे. त्याचवेळी केजरीवाल हे घरी पोहोचण्यापूर्वी सीएम हाऊस फुलांनी सजवण्यात आलं होतं. मार्गावर ठिकठिकाणी कार्यकर्ते जल्लोष करताना दिसत होते.
जनतेला एकत्र यावे लागेल : केजरीवाल म्हणाले, "आपला देश 4 हजार वर्षांहून जुना आहे, पण जेव्हा-जेव्हा कोणी या देशावर हुकूमशाही लादण्याचा प्रयत्न केला, तेव्हा लोकांनी ते सहन केले नाही. आज देश हुकूमशाहीच्या काळातून जात आहे. मी त्याविरोधात संघर्ष करत आहे. मात्र, या हुकूमशाहीचा पराभव करण्यासाठी जनतेला एकत्र यावे लागेल," अरविंद केजरीवाल हे शनिवारी सकाळी 11 वाजता दक्षिण दिल्लीत पत्रकार परिषद घेत रोड शोमध्येही सहभागी होणार आहेत.
2 जूनला करावं लागेल आत्मसमर्पण : सुनावणीदरम्यान, न्यायालयानं सर्व युक्तिवाद ऐकल्यानंतर आम्ही 1 जूनपर्यंत अंतरिम सुटका करत आहोत असं सांगितलं. दरम्यान, केजरीवाल यांचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या अटकेविरोधातील याचिकेवर जुलैमध्ये सुनावणी घेण्याची मागणी केली. याबाबत सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं की, केजरीवाल यांच्या या याचिकेवरील वाद पुढील आठवड्यात संपवण्याचा प्रयत्न करु. सॉलिसिटर जनरल यांनी ईडीतर्फे हजर राहून न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठाला अरविंद केजरीवाल यांना मुदत संपल्यानंतर आत्मसमर्पण करण्यास सांगण्याची विनंती केली. त्यावर न्यायालयानं म्हटलं की, दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना 2 जूनला आत्मसमर्पण करावं लागेल. अंतरिम जामीन देताना न्यायालयानं अटींबाबत काहीही सांगितलेलं नाही.
पंजाब आणि दिल्लीत प्रचार करु शकतील केजरीवाल : दिल्ली दारु धोरण प्रकरणात अटक करण्यात आलेल्या अरविंद केजरीवाल यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अंतरिम जामीन मंजूर करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या प्रकरणी अरविंद केजरीवाल यांना 21 मार्च रोजी अंमलबजावणी संचालनालयानं (ईडी) अटक केली होती. केजरीवाल यांच्या वकिलानं म्हटलंय की, अंतरिम जामीन मंजूर करताना सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक प्रचारावर कोणतेही निर्बंध घातलेले नाहीत. अशा प्रकारे केजरीवाल आता पंजाब, हरियाणा आणि दिल्लीत प्रचार करताना दिसणार आहेत.
हेही वाचा :