इटावा (उत्तर प्रदेश) Sivaganga Express Broke Signal : उत्तर प्रदेशातील इटावामध्ये आज सकाळी मोठी दुर्घटना टळलीय. शिवगंगा एक्सप्रेस लाल सिग्नल ओलांडून एक किमी पुढं गेली. यामुळं प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. यावेळी रेल्वेनं ओएचईची वीज खंडित करुन कशीतरी रेल्वे थांबवली. यानंतर प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. उत्तर मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी अमित सिंग यांनी याप्रकरणी तपास सुरु असून निष्काळजीपणा आढळल्यास दोन्ही लोको पायलटवर कारवाई केली जाईल, असं सांगितलं.
लाल सिग्नलच्या एक किमी पुढं गेली रेल्वे : मिळालेल्या माहितीनुसार, शिवगंगा एक्सप्रेसनं दिल्ली-हावडा रेल्वे मार्गावरील इटावामधील भरथना स्थानकाच्या पाच किलोमीटर आधी लाल सिग्नल (ओव्हरशूट) ओलांडला. यावेळी रेल्वेचा वेग ताशी 80 किमी होता. ही रेल्वे सिग्नलच्या जवळपास एक किलोमीटर पुढं गेली. यामुळं प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. हा प्रकार रेल्वे अधिकांऱ्यांच्या लक्षात येताच ओएचई वीज कापून रेल्वे थांबवण्यात आली. विशेष म्हणजे यावेळी हमसफर एक्स्प्रेसही त्याच मार्गावर उभी असताना ही घटना घडली. याप्रकरणी रेल्वेनं चौकशी सुरू केलीय. दोन्ही गाड्यांच्या चालकांची चौकशी करण्यात येत असून त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे.
मोठी दुर्घटना टळली : शिवगंगा एक्सप्रेसला (12599) भरथना स्थानकापूर्वी सिग्नल क्रमांक 507 च्या आधी थांबायचं होतं. हा सिग्नल लाल होता. पण रेल्वे त्याच्या एक किमी पुढं गेली. याबाबतची माहिती रेल्वे प्रशासनाला मिळताच तात्काळ ओएचई वीज खंडित करुन रेल्वे थांबवण्यात आली. शिवगंगा एक्सप्रेस ज्या मार्गावर होती, त्याच मार्गावर हमसफर एक्सप्रेस पुढं उभी असल्याचं सांगण्यात आलं. त्यामुळं सुदैवानं मोठी दुर्घटना टळली. यानंतर रेल्वे प्रशासनानं तुंडला जंक्शनवरुन वैशाली एक्स्प्रेसनं दोन लोको पायलट पाठवले होते. त्यांनी शिवगंगा एक्स्प्रेसच्या इंजिनची पाहणी केली. यानंतर सुमारे 25 मिनिटांनी ते रेल्वेला घेऊन निघाले.
दाट धुक्यामुळं घटना घडल्याची शक्यता : रेल्वे अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कानपूर ते दिल्लीपर्यंत स्वयंचलित सिग्नल यंत्रणा आहे. ही यंत्रणा दोषविरहीत आहे. त्यामुळं सिग्नलमध्ये कोणतंही बिघाड होऊ शकत नाही. आज सकाळी धुकं होतं. त्यामुळं लोको पायलटला सिग्नल दिसला नसल्याची शक्यता आहे. याशिवाय लोको पायलट झोपेत किंवा मद्यधुंद असल्यामुळं हा प्रकार घडला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. या दोघांची वैद्यकीय तपासणी सुरू आहे.
हेही वाचा :