चंदीगड Sidhu Moosewala : पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या निधनाला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. या दोन वर्षांनंतर सिद्धूची आई चरण कौर यांनी वयाच्या 58 व्या वर्षी मुलाला जन्म दिलाय. सिद्धू मुसेवालाचे वडील बलकौर सिद्धू यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिलीय. बलकौर यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर नवजात बाळासोबतचा एक फोटोही शेअर केलाय.
सिद्धू मुसेवालाच्या वडिलांनी मुलाचा पहिला फोटो केला शेअर : बलकौर सिद्धूंनी आपल्या इन्स्टाग्रामवर आपल्या नवजात बाळासोबतचा पहिला फोटो पोस्ट केलाय. या फोटोमध्ये ते आपल्या बाळासोबत दिसत आहेत. यासोबतच त्यांच्या बाजूला दिवंगत गायक सिद्धू मुसेवालाचा फोटो ठेवला आहे. यामध्ये श्रेष्ठ व्यक्ती मरत नाहीत, असे लिहिलंय. या फोटोसोबत गायकाच्या वडिलांनी पंजाबीमध्ये कॅप्शन लिहिलंय. "शुभदीपच्या लाखो चाहत्यांच्या आशीर्वादानं, देवानं आम्हाला शुभदीपचा लहान भाऊ दिलाय. वाहे गुरुच्या कृपेनं आमचे कुटुंब निरोगी आहे. जे लोक आमच्यावर खूप प्रेम करतात, आम्ही त्यांचे आभारी आहोत."
सिद्धू मुसेवालाची भरदिवसा हत्या : पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांची 29 मे 2022 रोजी निर्घृण हत्या करण्यात आली होती. गायकावर दिवसाढवळ्या गोळ्या झाडण्यात आल्या. यात सिद्धूचा जागीच मृत्यू झाला. शवविच्छेदनाच्या अहवालात सिद्धूच्या शरीरावर 24 गोळ्यांच्या खुणा आढळल्या होत्या. गायकाच्या मृत्यूमागे गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार टोळीचा हात असल्याचं समोर आलं.
जुळ्यांना जन्म दिल्याच्या अफवा : आपल्या मुलाच्या जन्मापूर्वीच सिद्धू मुसावालाच्या आईनं जुळ्या मुलांना जन्म दिल्याच्या बातम्या आल्या होत्या. पण त्याचे वडील बलकौर सिंह यांनी पोस्ट शेअर करून या अफवांना पूर्णविराम दिला होता. बलकौर सिद्धू यांनी फेसबुकवर लिहिलं होतं की, "आम्ही सिद्धूच्या चाहत्यांचे आभारी आहोत. त्यांना आमच्या कुटुंबाची काळजी आहे. माझ्या कुटुंबाबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. माझी तुम्हाला विनंती आहे की या सर्व अफवांवर विश्वास ठेवू नका. जी काही बातमी असेल, ती आम्ही तुमच्याशी शेअर करु."
हेही वाचा :