पाटणा Security Forces Destroyed Opium : शेतकऱ्यांनी पेरलेल्या अफूच्या 1276 एकरवरचं पीक सुरक्षा दलाच्या जवानांनी नष्ट केलं. ही घटना बिहारच्या गयामध्ये घडली असून अफूची शेती नष्ट केल्यानं नक्षलवाद्यांनी धमकी दिली आहे. गरीब शेतकऱ्यांना मारणाऱ्या सरकारला धडा शिकवला जाईल, असं नक्षलवाद्यांनी घटनास्थळी टाकलेल्या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.
"गयात 1276 एकर जमिनीवर अफूचं पीक लावण्यात आलं होतं. मात्र ते नष्ट करण्यात आलं असून कारवाई अद्यापही सुरूच आहे. अफूचं पीक पूर्णपणे नष्ट करण्याचा आमचा प्रयत्न आहे. अफूची शेती नष्ट झाल्यानं नक्षलवाद्यांमध्ये दहशत पसरली आहे. धमकीचं पत्रक सापडलं असून त्याची चौकशी सुरू आहे."- आशिष भारती, एसएसपी, गया
सुरक्षा दलानं केली 1276 अफूची शेती नष्ट : गयामध्ये इमामगंजच्या परिसरात तब्बल 1276 एकर अफूची शेती केली असल्याचं उघड झालं. त्यानंतर सुरक्षा दलाकडून हे अफूचं पीक नष्ट करण्यात आलं. पोलिसांनी अफूची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांवर कारवाई करण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळं नक्षलवादी चवताळले आहेत.
नक्षलवाद्यांनी दिली धमकी : सुरक्षा दलांनी इमामगंज इथली अफूची शेती नष्ट केल्यानं नक्षलवादी चांगलेच खवळले आहेत. त्यांनी सुरक्षा दलांच्या विरोधात पत्रक जारी केलं आहे. यात त्यांनी 'गरीब शेतकऱ्यांना मारणाऱ्या सरकारला त्याचे परिणाम भोगावे लागतील. त्यांची वाहनं जाळली जातील. पोलीस संगनमतानं शेतकऱयांची शेती नष्ट करत आहेत. त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील,' असं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.
नक्षलवाद्यांच्या पत्रानं उडाली खळबळ : नक्षलवाद्यांनी टाकलेल्या पत्रानंतर इमामगंज परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. नक्षलवाद्यांनी पोलिसांसाठी काम करणाऱ्या काही संशयित नागरिकांची नावं टाकली आहे. हे नागरिक पोलिसांसाठी काम करत असल्याचा नक्षलवाद्यांचा संशय आहे. यात सत्येंद्र यादव, संजय प्रसाद बऱ्हा, विजय यादव बऱ्हा, गोरेलाल प्रसाद यादव कुरकुरासन, फोटो यादव माहुलिया, प्रमोद यादव बर्हा आदी नागरिकांची नावं समाविष्ट आहेत. या नागरिकांना नक्षलवाद्यांनी गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा दिला आहे.
नक्षलवादी आणि माफियांच्या मदतीनं अफूची शेती : नक्षलवादी आणि माफियांच्या मदतीनं गया इथं हजारो एकर जमिनीत अफूचं पीक लावलं आहे. तीन दशकांपासून नक्षलवाद्यांच्या संरक्षणात अफूचं पीक लावण्यात येते, असा दावा करण्यात येत आहे. दरवर्षी सुरक्षा दलांकडून अफूची शेती नष्ट करण्यासाठी कारवाई करण्यात येते. आत्तापर्यंत 1276 एकरातील पीक नष्ट झाले आहे. "शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर अफूचं पीक लावलं होतं, ते नष्ट केलं जात आहे. ही मोहीम अद्याप सुरू आहे. नक्षलवाद्यांनी अफूची शेती नष्ट करण्यावर प्रभाव टाकण्यासाठी पत्र टाकली आहेत. मात्र, नक्षलवाद्यांचं पत्रक जप्त करण्यात आलं आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. पत्रक नक्षलवाद्यांनी टाकलं की एखाद्या समाजकंटकांचं काम आहे ? याबाबतचा तपास सुरू आहे, " अशी माहिती इमामगंज उपविभागीय पोलीस अधिकारी अमित कुमार यांनी दिली आहे.
हेही वाचा :