पश्चिम बंगाल Sandeshkhali Violence Case : संदेशखळी हिंसाचार प्रकरणी टीएमसी नेता शेख शाहजहानला (TMC leader Sheikh Shahjahan Arrest) पश्चिम बंगाल पोलिसांनी अटक केलीय. याबाबतची माहिती मिनाखानचे 'एसडीपीओ' अमिनुल इस्लाम खान यांनी दिलीय.
कलकत्ता न्यायालयाचे स्पष्ट आदेश : तृणमूल काँग्रेसचा नेता शेख शाहजहानला अटक करण्यासाठी अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) स्वतंत्र असल्याचं कलकत्ता उच्च न्यायालयानं बुधवारी स्पष्ट केलं होतं. न्यायमूर्ती टी.एस. शिवगणनम आणि न्यायमूर्ती हिरण्मय भट्टाचार्य म्हणाले की, "तृणमूल काँग्रेसच्या नेत्यावरील आरोपांची चौकशी करणाऱ्या पश्चिम बंगाल पोलिसांबद्दल गंभीर आक्षेप आहेत. त्यामुळं ईडी आणि सीबीआय हे शाहजहानला अटक करण्यासाठी स्वतंत्र आहेत.
ममता बॅनर्जींचा आरोप : पश्चिम बंगालच्या उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील संदेशखळी येथे काही दिवसांपूर्वी लैंगिक हिंसाचाराची घटना घडली होती. या घटनेनं पश्चिम बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातंय. हा आता एक राजकीय मुद्दा बनलाय. भाजपानं या विषयाला खतपाणी घातल्याचा आणि हिंसा भडकवल्याचा आरोप, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेस (टीएमसी) च्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी केलाय. तर राज्य सरकारनं घटनास्थळी भेट देण्याची परवानगी नाकारल्याचा आरोप, विरोधकांनी केला होता.
प्रकरणावरुन राजकीय गदारोळ : संदेशखळी लैंगिक छळ प्रकरणाबाबत 16 फेब्रुवारीला बराच गदारोळ झाला होता. भाजपाच्या शिष्टमंडळानं संदेशखळीत जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना रोखलं होतं. भाजपाचे कार्यकर्ते परतल्यानंतर काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांनी संदेशखळीत जाण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, पोलिसांनी त्यांनाही रोखलं होतं. यावरून काँग्रेस कार्यकर्ते, पोलिसांमध्ये बाचाबाची झाली होती.
हेही वाचा - संदेशखळी लैंगिक छळ प्रकरणी आतापर्यंत 18 जणांना अटक