पाटणा : अभिनेता सलमान खानच्या मुंबईतील गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणात अटक करण्यात आलेले दोन्ही शूटर हे बिहारमधील बेतिया येथील रहिवासी आहेत. बिहारच्या बेतिया पोलिसांनी दोन्ही तरुणांच्या पालकांची चौकशी करण्यास सुरुवात केली. दोन्ही आरोपींचे कुटुंबीय मुलगा निर्दोष असल्याचा दावा करत आहेत.
अभिनेता सुपरस्टार सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर दोन दुचाकीस्वारांनी १४ एप्रिलला गोळीबार केला. दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी गोळीबारानंतर मुंबईतून पळ काढत गुजरात गाठलं होतं. गोळीबार करणाऱ्या आरोपींना अटक करण्यासाठी मुंबई गुन्हे शाखेनं १५ पथक नेमली. त्यात गुजरातला गेलेल्या मुंबई गुन्हे शाखेच्या पथकानं दोन्ही आरोपींना सोमवारी रात्री गुजरातच्या भुजमधून अटक केली आहे. विकी साहेब गुप्ता (वय 24 वर्ष) आणि सागर श्रीजोगेंद्र पाल (वय 21 वर्ष) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. दोन्ही तरुण हे पश्चिम चंपारणच्या गौनाहा पोलीस स्टेशन हद्दीतील मसाही गावचे रहिवाशी आहेत.
काय आहे पालकांचा दावा- विक्कीची आई सुनीता देवी म्हणाली, "होळी झाल्यानंतर दोन दिवसांनी मुलगा पैसे कमविण्यासाठी मुंबईत गेला होता. तो तिथं काय करत होता, याची आम्हाला माहिती नाही." सागर पालची आई रंभा देवी म्हणाली, "होळीनंतर मुलगा पैसे कमविण्यासाठी मुंबईत गेला होता. सागर पालच्या वडिलांनीही मुलगा निर्दोष असल्याचं सांगितलं. बेतिया पोलिसांनी सोमवारी उशिरा रात्री दोन्ही तरुणांच्या कुटुंबीयांना ताब्यात घेऊन चौकशी केल्याची माहिती पंचायत प्रमुख प्रतिनिधी सोवलाल यांनी दिली.
आरोपींच्या वडिलांची पोलिसांकडून चौकशी- सलमानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणात गावातील दोन तरुणांना अटक केल्यानं ग्रामस्थांना धक्का बसला आहे. बेतियाचे एसपी अमरेश डी यांनी सांगितले की, "बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणात मुंबईत अटक करण्यात आलेले दोन्ही गुन्हेगार हे पश्चिम चंपारण जिल्ह्यातील रहिवासी आहेत. गोळीबार प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत. अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींच्या वडिलांची पोलिसांकडून चौकशी केली जात आहे."
- लॉरेन्स बिष्णोईशी संबंध आहे का?अटकेतील आरोपींना गुजरातमधून मुंबईला विमानानं आणले. आरोपींना न्यायलयात हजर केल्यानंतर न्यायालयानं पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपींचा लॉरेन्स बिष्णोई गँगशी संबंध आहे का? सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करण्याचं कारण काय? या अनुषंगानं मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून तपास सुरू आहे.
हेही वाचा-