मुंबई Rape Case On Sajjan Jindal Fake : देशातील प्रख्यात उद्योगपती सज्जन जिंदाल यांच्यावर एका अभिनेत्रीनं कथित बलात्कार केल्याची तक्रार दाखल केली होती. या अभिनेत्रीच्या तक्रारीवरुन उद्योगपती सज्जन जिंदाल यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा 2 महिन्यांपूर्वी दाखल करण्यात आला होता. मात्र ही तक्रार खोटी असल्याचं मुंबई पोलिसांच्या तपासात उघड झालं आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी न्यायदंडाधिकारी न्यायालयात क्लोजर रिपोर्ट सादर केला. हा आरोप आणि गुन्हा खोटा असल्याचं मुंबई पोलिसांच्या अहवालात म्हटलय. त्यामुळे सज्जन जिंदाल यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सज्जन जिंदाल यांच्याविरोधात अभिनेत्रीची बलात्काराची तक्रार : "उद्योगपती सज्जन जिंदाल यांनी एका 2023 मध्ये लग्नाचे वचन दिलं होतं. त्या बहाण्यानं त्यांच्या मुंबईतील कार्यालयामध्ये तिची भेट झाली असता, तिच्यावर बलात्कार केला," अशी तक्रार त्या अभिनेत्रीनं वांद्रे पोलीस ठाण्यामध्ये दिली होती. परंतु यासंदर्भात वांद्रे कुर्ला संकुल पोलीस ठाणे यांच्या वतीनं तपास करुन त्याबाबतचा क्लोजर रिपोर्ट वांद्रे न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात सादर केला. या अहवालात गुन्हा खोटा असल्याचं पोलिसांनी नमूद केलं आहे.
ओळख झाली दुबईत बलात्कार झाला मुंबईत : अभिनेत्रीची दुबईमध्ये जे एस डब्ल्यू कंपनीचे संचालक सज्जन जिंदाल यांची क्रिकेट सामन्याच्या दरम्यान भेट झाली होती. त्यानंतर त्यांची मैत्री झाली आणि 23 जानेवारी 2024 मध्ये त्या महिलेकडून वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली होती. अभिनेत्रीच्या तक्रारीवरुन सज्जन जिंदाल यांच्याविरोधात भारतीय दंड विधान कलम 376, 354 आणि कलम 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तक्रारदार अभिनेत्री जबाब नोंदवण्यासाठी आलीच नाही : या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयामध्ये त्या अभिनेत्रीच्या वतीनं युद्ध पातळीवर खटला दाखल केला होता. मुंबई उच्च न्यायालयातील खंडपीठाच्या आदेशानंतर पोलिसांना न्यायालयानं चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार "वांद्रे बिकेसी मुंबई पोलिसांनी फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 164 नुसार तक्रारदाराकडं पाठपुरावा करुन देखील तक्रारदार महिलेकडूनकडून जबाब नोंदवला गेला नाही. त्यावरुनच आरोपी सज्जन जिंदाल यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करुन अडकवण्याचा उद्देश असल्याचं दिसून येते," असं पोलिसांनी त्या अहवालात नमूद केलेलं आहे.
उद्योगपती सज्जन जिंदाल यांना क्लिन चिट : अभिनेत्रीनं उद्योगपती सज्जन जिंदाल यांच्यावर आरोप केले होते ते मागच्या वर्षीच सज्जन जिंदाल यांनी फेटाळून लावले होते. परंतु आता प्रत्यक्षात पोलिसांच्या चौकशी अहवालातच त्यांना क्लिन चिट मिळाली. मुंबईतील न्यायदंडाधिकारी वांद्रे न्यायालयात तो अहवाल सादर झाला. त्यामुळे सज्जन जिंदाल यांना हा दिलासा मिळाला आहे.
हेही वाचा :